बुलडाण्यात पोलिस भरतीच्या चौथ्या दिवशी १३२ उमेदवारांना वाजली थंडी! अर्ज भरला पण मैदानावर आलेच नाहीत..

 
jhvb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात ५१ जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे. ५१ जागांसाठी ४,४४६ अर्ज दाखल झाले होते. २ जानेवारीपासून  बुलडाणा येथील पोलिस ग्राउंड वर एसपी सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या   भरती प्रक्रियेवर ४ विशेष पथके लक्ष ठेवून आहेत . दरम्यान आज, ५ जानेवारीला भरती प्रक्रियेच्या चौथ्या दिवशी अर्ज भरलेल्या १३२ उमेदवारांनी भरती प्रक्रियेला दांडी मारली. आज सकाळपासून बुलडाणा शहराला धुक्याने वेढलेले आहे. तापमान सुद्धा कमालीचे घसरले असल्याने "त्या" १३२ जणांना थंडी वाजली काय? अशी मजेशीर चर्चा आहे.

५०० परीक्षार्थींना आज शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते.  मात्र प्रत्यक्षात ठरलेल्या वेळेत ३६८ जणांनी मैदानावर हजेरी लावली. तब्बल १३२ जण मैदानी चाचणीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे अर्ज भरूनही त्यांना भरती प्रक्रियेचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. आज झालेल्या प्राथमिक चाचणीत ४३ परीक्षार्थी  अपात्र ठरल्याने  प्रत्यक्षात ३२५ जणांची मैदानी चाचणी आज पार पडत आहे. भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी म्हणून २५ सीसीटिव्ही कॅमेरे या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत हे विशेष..!