संजय राऊत म्हणतात, वाझेंमुळे अडचणीत याल हे मी सरकारला आधीच बजावले होते!
वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीला धडा मिळाल्याचे वक्तव्य
मुंबई : शिवसेनेचे खासदार, नेते संजय राऊत यांची गाडी सध्या घसरेल व काय बोलून ते कुणाला अडचणीत आणतील याचा काही भरवसा राहिलेला नाही. पण यावेळी त्यांनी त्यांच्याच पक्षाची व नेत्यांची अडचण केली आहे. सचिन वाझे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते हे मी आधीच बजावले होते. त्यांना पोलीस दलात परत घेताना मी त्याला विरोध केला होता. त्यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची अडचण होईल, असे मी शिवसेना नेत्यांना सांगितले होते. पण तरीही आपला इशारा डावलून त्यांना पोलीस दलात परत घेतले गेले. वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला एक धडा मिळाला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. हे त्यांनी कुणाला सांगितले होते, त्या नेत्याचे नाव उघड करण्यास त्यांनी नकार दिला. पण त्यांच्या वक्तव्याने शिवसेनेत तो नेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, वाझेबाबत आपण शिवसेना नेत्यांशी बोललो होतो.त्यांनाही त्याची जाणिव आहे. वाझे प्रकरण घडले हे एका अर्थाने चांगलेच झाले. कारण त्यामुळे महाविकास आघाडी सरकराला धडा मिळाला आहे.वाझे हा काही दहशतवादी नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, त्याबाबत विचारले असता, त्यावेळी त्यांना वाझेंच्या कामाबाबत माहिती नव्हती, असे उत्तर त्यांनी दिले. कोणतीही व्यक्ती वाईट नसते. पण कधीकधी परिस्थिती तिला तसे बनवते असेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे वक्तव्य वाझेंबाबत होते, असा तर्क लढविला जात आहे.