अनुराधा नागरी सहकारी बँकेने पीक कर्जाच्या नावावर हडपलेली रक्कम वसूल करावी; शेतकर्‍यांचे मंत्री यशोमती ठाकूर यांना साकडे

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनुराधा नागरी सहकारी बँकेने पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली. परंतु मिळालेली रक्कम शेतकर्यांना न देता स्वतःच हडप करून शासनासोबतच शेतकर्यांनाही चुना लावून भ्रष्टाचार केला. ही हडप केलेली रक्कम अनुराधा अर्बन बँकेकडून वसूल वसूल करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अन्याय …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः अनुराधा नागरी सहकारी बँकेने पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली. परंतु मिळालेली रक्कम शेतकर्‍यांना न देता स्वतःच हडप करून शासनासोबतच शेतकर्‍यांनाही चुना लावून भ्रष्टाचार केला. ही हडप केलेली रक्कम अनुराधा अर्बन बँकेकडून वसूल वसूल करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अन्याय ग्रस्त शेतकर्‍यांनी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
23 जानेवारी रोजी यशोमती ठाकूर या चिखलीत आल्या असता अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी अन्याय दूर करण्याचा आर्त टाहो फोडला. निवेदनात म्हटले आहे की, की चिखली पंचक्रोशीतील अनेक शेतकर्‍यांनी अनुराधा नागरी सहकारी बँकेकडून सन 2006 ते 2008 च्या दरम्यान कर्ज घेतले आहे. या कर्जाची नियमित परतफेडदेखील शेतकर्‍यांनी केली होती, परंतु शेतकर्‍यांचे कर्ज थकीत नसताना अनुराधा नागरी सहकारी बँकेने खोटे रेकॉर्ड दाखवून केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपये कर्जमाफी मिळवले. सदर रक्कम शेतकर्‍यांच्या नावावर मिळाली असल्याने ती शेतकर्‍यांना परत देणे गरजेचे होते. परंतु अनुराधा बँकेच्या व्यवस्थापनाने सदर रक्कम परस्पर लाटली व शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. आपण सद्यःस्थितीत काँगेसच्या कार्याध्यक्षा आहात तसेच, बुलडाणा जिल्हाच्या संपर्कमंत्री आहात, अनुराधा नागरी सहकारी बँकेचे सर्वेसर्वा राहुल बोंद्रे यांनी कर्जमाफीचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी बांधवांवर अन्याय होत आहे. हा अन्याय आपण निश्‍चितच दूर कराल अशी आशा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी बांधवांचे कोट्यावधी रुपये थकविल्यामुळे काँग्रेस पक्षाचीही बदनामी होत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही परंतु राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांच्या नावावर शासनाकडून घेतलेली रक्कम शेतकर्‍यांना परत दिल्यास शेतकर्‍यांवरील अन्याय दूर होईल तरी या प्रकरणी उचित कार्यवाही करून अनुराधा अर्बन बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडून रक्कम वसूल करून देण्याबाबत निवेदनातून विनंती केली आहे. निवेदनावर रमेश अकाळ, अनमोल ढोरे, पांडुरंग मुरकुटे, प्रकाश ढोरे, अशोक अकाळ, राजू अकाळ, विष्णू मुरकुटे, दत्तात्रय ढोरे, अशोक ढोरे, देविदास मुरकुटे, हरिभाऊ गवई, भगवान ढोरे, पंढरी गोंधळे, अनिल अकाळ या शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.