मिताली राजने गाठला दहा हजार धावांचा एव्हरेस्ट
विक्रम करणारी पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू
नवी दिल्ली : एखाद्या भारतीय महिला क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठल्याचा अभूतपूर्व विक्रम मिताली राजच्या नावे जमा झाला आहे. स्टार क्रिकेटपटू असलेल्या मिताली राजने दक्षिण आप्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत लखनौ येथे झालेल्या तिसर्या एकदिवशीय सामन्यात ३६ धावा काढल्या. पण त्या मोलाच्या ठरल्या. त्यामुळे भारताने हा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. शिवाय हा अनोख विक्रम मितालीला स्वत:च्या नावे करता आला. हा विक्रम साकारणारी मिताली ही भारताची पहिली तर जगातील केवळ दुसरी महिला क्रिकेटर आहे. भारताच्यावतीने याआधी सचिन, धोनी, विराट द्रवीड,गांगुली, सुनील गावस्कर या सहा क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे. पण महिला क्रिकेटपटूंमध्ये खोर्याने धावा ओढणारी मिताली ही पहिलीच क्रिकेटर असून तिच्यावर लवकरच चित्रपटही येणार आहे.