‘घरातील सामान घेऊन निघून का गेली नाहीस?’ म्हणत घरात घुसला अन् चाकूने हल्ला; महिलेसह तिघे जखमी, मलकापूरमध्ये खळबळ...
याप्रकरणी लक्ष्मी प्रकाश रावणचवरे (वय २३, रा. सुभाषचंद्र बोस नगर, मलकापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता लक्ष्मी रावणचवरे या त्यांच्या बहिणीसह घरी असताना आकाश साहेबराव रावणचवरे (वय २७, रा. बहापुरा, ता. मलकापूर) हा हातात चाकू घेऊन घरात घुसला.‘तू माझ्या घरातून सर्व सामान घेऊन निघून का गेली नाहीस?’ असे म्हणत आरोपीने हातातील चाकूने लक्ष्मी यांच्या उजव्या छातीवर वार करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. लक्ष्मी यांना सोडविण्यासाठी त्यांची बहीण मध्ये आली असता तिच्या उजव्या हाताच्या दोन बोटांवरही चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, लक्ष्मी यांचे भाऊजी सतीश वन्हाडे हे घटनास्थळी आले असता आरोपीने त्यांच्या डाव्या बाजूला पोटावर चाकूने वार करून त्यांनाही जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर आरोपीने सर्वांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या घटनेनंतर मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी आकाश साहेबराव रावणचवरे याच्याविरुद्ध अप. क्र. ६७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३३३ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत.