SPORTS थरारक शेवट! शेवटच्या चेंडूवर पोलिस ११ संघाचा विजय ढोमणेंचा निर्णायक चौकार; कृष्णा सपकाळचे दमदार अर्धशतक व्यर्थ...! पोलीस आणि पत्रकारांत रंगला मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना....
पत्रकार ११ संघाने पहिले फलंदाजी करत निर्धारित १० षटकात ७ गडी गमावून ७६ धावा उभारल्या. सुरुवातीलाच दोन धावांवर पहिली विकेट पडल्याने दबाव वाढला. मात्र, कृष्णा सपकाळ यांनी एक टोक शेवटपर्यंत सांभाळत बिनबाद ५१ धावांचे अर्धशतक झळकावले आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला.
अजय शिंदे (८) यांनी काही वेळ साथ दिली; विनोद सावळे (५), सुधाकर जाधव आणि इतर फलंदाज लवकर परतले. शेवटच्या टप्प्यात सपकाळ आणि नीलेश जोशी (३) यांनी झुंज देत ७० धावांचा टप्पा ओलांडला.
--अंबूलकरांची धडाकेबाज खेळी, पण शेवटचे षटक ठरले निर्णायक--
प्रत्युत्तरात पोलिस ११ संघाने सावध पण नियोजनबद्ध सुरुवात केली. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी १७ धावा काढत आक्रमक खेळी केली, पण उंच फटका मारताना ते झेलबाद झाले. त्याआधी एसडीपीओ सुधीर पाटील ७ धावांवर बाद झाले.दुसऱ्या बाजूला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबूलकर यांनी ३१ धावांची सशक्त खेळी करत एक टोक भक्कम धरून ठेवले. मात्र शेवटच्या तीन षटकांत विकेट्स गडगडू लागल्याने पोलिसांवर दबाव वाढत गेला.७ चेंडूत ८ धावांची गरज असताना अंबूलकर झेलबाद झाले. सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. पत्रकार संघाचे सोहम घाडगे, विनोद सावळे आणि कृष्णा सपकाळ यांनी अचूक गोलंदाजी करत सामना आपल्या गळ्यात घालण्यासारखी स्थिती निर्माण केली.
--शेवटचा चेंडू… आणि ढोमणेचा विजयी फटका!--
शेवटच्या चेंडूवर पोलिस संघाला विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती. दडपणाच्या क्षणी एपीआय दीपक ढोमणे यांनी लॉंग-ऑफच्या दिशेने अफलातून चौकार ठोकत सामना पोलिस संघाच्या खात्यात जमा केला. मैदानावर जल्लोष उसळला आणि हा मैत्रीपूर्ण सामना ‘थरारक’ म्हणावा असा ठरला.
विजेता–उपविजेत्यांचा गौरव
पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या हस्ते विजयी पोलिस ११ संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. उपविजेता पत्रकार ११ संघाचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के हे या कार्यक्रमासाठी खासकरून उपस्थित होते. त्यांच्या सोबतच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, नीलेश जोशी, नितीन कानडजे, एसडीपीअेा सुधीर पाटील, पीआय सुनील आंबूलकर, गजानन धांडे, संदीप वंत्रोले, सुधाकर जाधव, राहूल जाधव, सोहम घाडगे, हरीश गायकवाड, हर्षनंदन वाघ तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांच्या नियोजातूनच खऱ्या अर्थाने अशा स्वरुपाच्या सामन्याची एक संकल्पना पुढे आल होती. पोलिस अधीक्षकांनीही त्यादृष्टीने सकारात्मकता दाखवली होती.
--“व्यसनमुक्तीसाठी खेळ अत्यंत प्रभावी” – एसपी तांबे--
जागतिक अमलीपदार्थविरोधी दिनानंतर (२६ जून) बुलढाणा जिल्ह्यात ‘नशामुक्त जिल्हा’ ही संकल्पना घेऊन पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी ‘मिशन परिवर्तन’ सुरू केले आहे. या निमित्ताने त्यांनी ‘व्यसनमुक्तीसाठी खेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळातून सांघिकता, शिस्त आणि संवाद वाढतो; समाजात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे अशा स्वरुपाच्या क्रीडा स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
