पोलीस प्रशासन सेवेत येणाऱ्यांना ठाणेदार सुनील अंबुलकरांचा कानमंत्र!

 

जळगाव जामोद (सतीश भारसाकळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनसेवेबरोबरच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पोलीस प्रशासनात सेवा हे चांगले करिअर आहे. साहस, समयसूचकता आणि कर्तव्यदक्षपणा असेल तर या क्षेत्रात निश्चित यशाचे इमले बांधता येतात. या क्षेत्रात येण्यासाठी पालकांनीही पाल्याला आधार देण्याची गरज आहे. कारण घरातून बळ मिळाले तरच आत्‍मविश्वास निर्माण होत असतो… असा कानमंत्र जळगाव जामोदचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी पोलीस प्रशासन सेवेत करिअर करू इच्‍छिणाऱ्यांना दिला.

बुलडाणा लाइव्हशी आज, २० ऑक्‍टोबरला त्‍यांनी औपचारिक गप्पा मारल्या. त्‍यावेळी ते बोलत होते. सध्या सोशल मीडियाचे युग आहे. स्‍मार्टफोनमध्ये अवघे जग सामावले आहे. यामुळे जगणे सुसह्य झाले असले तरी सतर्क राहण्याची गरजही तितकीच वाढली आहे. सायबर गुन्‍हे मोठ्या प्रमाणावर घडत अाहे. या गुन्ह्यांचे शिकार आपण होण्याआधीच काळजी घेतली पाहिजेत. बँका, सायबर क्राईम विभाग वेळोवेळी सूचना करून गैरप्रकार टाळण्यासाठी प्रयत्‍न करत असतात. या सूचनांकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ऑनलाइन फसवणूक झालीच तर तातडीने संबंधित बँक, पोलिसांशी संपर्क साधला तर खात्‍यातून गेलेले पैसे परतही मिळवता येतात. बँक डिटेल्‍स, एटीएमचा नंबर व त्‍यावरील सीव्‍हीही, आपली जन्‍मतारिख, वैयक्‍तीक माहिती कुणालाही फोनवर देऊ नये. अगदी बँकेतून फोन आला तरीही माहिती देण्याची गरज नसते. शंका असेलच तर थेट बँकेत जाऊन संपर्क करावा, असे आवाहनही श्री. अंबुलकर यांनी केले.

पोलीस प्रशासनातील गावपातळीवरचा सर्वांत शेवटचा घटक पोलीस पाटील असून, त्‍यांच्‍याशी समन्वयातून गावपातळीवरील गुन्‍हे कमी करण्याचा आमचा प्रयत्‍न असतो. वेळोवेळी पोलीस पाटलांची बैठक घेऊन सूचनाही केल्या जातात. अनेक गुन्ह्यांच्‍या तपासात पोलीस पाटलांचे मोठे सहकार्य लाभले आहे, असेही श्री. अंबुलकर म्‍हणाले.

वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांना इशारा…
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी कारवाया केल्या जातात. वाहतुकीचे नियम मोडून वाहनधारक स्वतःच्‍या जिवाला धोका निर्माण तर करतातच पण अन्य मंडळींच्‍या जिवाला त्‍यांच्‍यामुळे धोका निर्माण होतो. नियम पाळण्याची काळजी प्रत्‍येक वाहनधारकाने घ्यावी. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पुढच्‍या काळातही कडक कारवाईसत्र सुरूच ठेवणार असल्याचे श्री. अंबुलकर यांनी सांगितले.

वाढत्‍या गुन्ह्यांबद्दल म्‍हणाले…
जळगाव जामोद तालुक्‍यात गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. जवळपास ८५ खेडी आणि जळगाव जामोद शहराचा व्याप आमच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येतो. गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्यासाठी यंत्रणा अहोरात्र राबत असते. गुन्‍हे रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जातात. समाजातील ज्‍येष्ठांचे सहकार्य त्‍यासाठी घेतले जाते, असेही ते म्‍हणाले.