…म्‍हणून हिवरा आश्रममध्ये झाले नाही साहित्‍य संमेलन!; “महाराष्ट्र अंनिस’चे ज्‍येष्ठ पदाधिकारी नरेंद्र लांजेवार यांचा गौप्यस्‍फोट; मलकापूरच्‍या आश्चर्यस्‍पद घटनेचेही गूढ उकलले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे अशी शुकदास महाराजश्रींची खूप इच्छा होती. तिथे देशस्तरावरचं विज्ञान संमेलन भरतं, मग साहित्य संमेलन भरायला काहीच हरकत नाही. ते एक चांगलं शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे आम्हीही पुढाकार घेतला आणि संमेलन तिथे घेण्याची घोषणाही झाली. पण काहींच्या पोटात दुखलं आणि …
 
…म्‍हणून हिवरा आश्रममध्ये झाले नाही साहित्‍य संमेलन!; “महाराष्ट्र अंनिस’चे ज्‍येष्ठ पदाधिकारी नरेंद्र लांजेवार यांचा गौप्यस्‍फोट; मलकापूरच्‍या आश्चर्यस्‍पद घटनेचेही गूढ उकलले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन व्‍हावे अशी शुकदास महाराजश्रींची खूप इच्‍छा होती. तिथे देशस्‍तरावरचं विज्ञान संमेलन भरतं, मग साहित्‍य संमेलन भरायला काहीच हरकत नाही. ते एक चांगलं शैक्षणिक केंद्र आहे. त्‍यामुळे आम्‍हीही पुढाकार घेतला आणि संमेलन तिथे घेण्याची घोषणाही झाली. पण काहींच्‍या पोटात दुखलं आणि त्‍यांनी विरोध केला. श्याम मानव यांच्‍या गटाने केलेला टोकाचा विरोध आणि आरोप-प्रत्‍यारोपांमुळे चांगल्या कार्याला गालबोट लागू नये म्‍हणून आश्रमानेच माघार घेतली. पण यामुळे बुलडाणा जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले, असे परखड मत प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्‍येष्ठ पदाधिकारी नरेंद्र लांजेवार यांनी व्‍यक्‍त केले आणि अप्रत्‍यक्षरित्या श्याम मानव यांनी वैयक्‍तीक हेवेदाव्यापोटी, आश्रमाबद्दल असलेल्या द्वेषापोटी बुलडाणा जिल्ह्याच्‍या त्‍यावेळी केलेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले.

“बुलडाणा लाइव्ह’तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची कार्यालयात बोलावून थेटभेट या उपक्रमात मुलाखत घेतली जाते. काल, २५ सप्‍टेंबरला दुपारी श्री. लांजेवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्रद्धा ते अंधश्रद्धा, धर्म, बहुजन शब्‍दाची व्याख्या, सरकारबद्दलचं मतं आणि एकूण अंधश्रद्धेचे प्रकार त्‍यांनी मुलाखतीतून उलगडले. काही विषयांवर त्‍यांनी केलेल्या वक्‍तव्‍यांमुळे ही मुलाखत विशेष गाजली.

कृष्णा सपकाळ ः १९८९ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्‍थापना झाली. त्‍यानंतर समितीत सतत गट पडत गेले. दाभोळकरांचा वेगळा गट झाला, मानवांचा एक गट झाला आणि आता अविनाश पाटील यांच्या वेगळ्या गटाची चर्चा होते. संघटनेत अशी दुफळी का निर्माण झाली किंवा होतेय?
नरेंद्र लांजेवार ः राज्‍यात अंधश्रद्धा निर्मूलनाची एवढी गरज आहे की दोन- तीन गटही एवढे काम करू शकत नाहीत. प्रत्‍येक जिल्ह्यात स्वतंत्र गट झाला तरी स्वागत केलं पाहिजेत. गट महत्त्वाचे नाही, काम महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात मोठा स्‍कोप आहे. त्‍यामुळे कितीही गट झाले तरी कमीच आहेत. व्यापक भूमिकेच्‍या अनुषंगाने रूसवे फुगवे होतात. राजकीय पक्षांत, कोणत्‍याही संघटनेत जसा हा प्रकार दिसतो तो अंनिसमध्येही आहे, असे ते म्‍हणाले.

कृष्णा सपकाळ ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आर्थिक नियोजन कसे चालते? कारण २०१७ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने समितीला नोटीस दिली होती की विदेशातून समितीला मिळणाऱ्या पैशांचा हिशोब दिला जात नाही. सनातन समितीनेही आराेप केला होता की विदेशातून समितीला फंडिंग होतं आणि हा फंड हिंदू श्रद्धास्‍थानांवर आघात करण्यासाठी वापरला जातो, यावर काय सांगाल?
नरेंद्र लांजेवार ः तुमच्या या प्रश्नामध्येच उत्तर आहे, की सनातन समितीनेच आरोप केला… ज्‍या लोकांनी हा विचार संपविण्यासाठी पुढाकार घेतला. तीच संस्‍था, तीच माणसं असे खालच्या स्‍तरावरचे आरोप करू शकतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरुवातीपासून भूमिका ठेवली होती की कार्यकर्त्यांच्‍या डोनेशनवर, मासिकातील जाहिरातीच्‍या उत्‍पन्‍नावर चळवळ चालवायची. आम्‍ही कुणाकडून विदेशातून फंड घेतलेला नाही. चॅरिटी फंड तपासणीतही ही बाब समोर आली. आमच्‍या संघटनेबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम सनातन समितीने केलं. अनेक शिक्षक, प्राध्यापक, डॉक्‍टर्स, उच्‍चशिक्षित मंडळी या चळवळीत विनावेतन, विना मानधन काम करते. इथे कुणीच पैशांची अपेक्षा करत नाही. त्‍यामुळे काहींच्‍या पोटात दुखतं.

कृष्णा सपकाळ ः अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक आपण कसा स्‍पष्ट कराल?
नरेंद्र लांजेवार ः मुळातच आपल्याला अंधश्रद्धेला विरोध करायचा आहे. कुणाच्या श्रद्धेला नाही. देवाधर्माच्या नावावर काही मध्यस्‍थी करणारी माणसं जेव्‍हा खोटे दावे करतात, की आमच्याकडं अलौकिक शक्‍ती आहे आणि आम्‍ही तुमचं भलं करतो. देवाधर्माच्या नावावर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा लोकांना आमचा विरोध आहे. आम्‍ही कुणाच्‍याही धर्माच्‍या किंवा धार्मिक आचरणाच्या विरोधात नाही. ज्‍यांना आमच्या संघटनेबद्दल माहिती नाही ते काहीही सांगतात की यांचा देवाधर्माला विरोध आहे. देवाधर्माच्‍या नावावर शोषण झालेल्या व्‍यक्‍तीने तक्रार केली तर आम्‍ही पुढाकार घेऊन हस्‍तक्षेप करतो.

कृष्णा सपकाळ ः जिल्ह्यात आजार, रोगातून बरे करणारी अनेक अनधिकृत केंद्र बुवाबाबांनी उभारलेली आहेत. त्‍याबद्दल कुणी तक्रार करत नसेल तर अंनिसने लक्षच द्यायचं नाही का..?
नरेंद्र लांजेवार ः आम्‍ही अनेक ठिकाणी गेलो. तिथे प्रबोधन केलं. त्‍या लोकांनी तात्‍पुरते ते बंदही केलं. पण त्‍यांचे पुन्‍हा दरबार सुरू होतात. त्‍यामुळे कुणीतरी एक जण पुढे यायला हवं. त्‍याने तक्रार द्यावी. त्‍याने तक्रार दिली की समिती काम करते. आजवर बुलडाणा जिल्ह्यात आपण १२-१३ बाबालोकांना एक्‍स्‍पोज केलेलं आहे. यातील काहींनी विनयभंग केले, काहींनी बोगस औषधोपचार केले. अशा लोकांचे सत्‍य आपण सर्वांसमोर आणलं. कायदेशीर लढाई लढायची असेल तर ज्‍याचे शोषण किंवा फसवणूक झालेली आहे, त्‍याने समोर येण्याची गरज असते.

कृष्णा सपकाळ ः महाराष्ट्रात दोन साधूंची हत्‍या झाली तेव्‍हा महाराष्ट्र अंनिसने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा निषेध व्‍यक्‍त केला नाही…
नरेंद्र लांजेवार ः आमची संघटना कोणत्‍याही हत्‍येच्‍या विरोधातच आहे. त्‍यावेळी आम्हाला कुणी प्रतिक्रिया विचारली असती, बाईट मागितला असता तर आम्‍ही बोललो असतो. आमचा हिंसेला विरोध आहे.

मनोज सांगळे ः मलकापूरमध्ये गौरी विसर्जनाच्या दिवशी महालक्ष्मींच्‍या मूर्तींच्‍या डोळ्यातून अश्रू आल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्‍याबद्दल काय सांगाल?
नरेंद्र लांजेवार ः त्‍याला प्रकाशाचा खेळ म्‍हणता येईल. मूर्ती प्‍लास्टिक कोटेड असतात. त्‍या बोलक्या असल्यामुळे त्‍यावर मर्क्यूरी लाईट्‌सचा प्रकाश पडला की डोळ्यांखाली, गालावर पाणी आल्यासारखे भासते. ती मूर्ती रडत नसते, मर्क्यूरी लाईटचा प्लास्‍टिक ऑफ पॅरीसच्या मूर्तीच्‍या रंगावर पडलेला प्रकाश प्रतिबिंबीत होत असतो. तो प्रकाश पाण्यासारखा भासतो. जर खरंच मूर्ती रडत असत्या तर त्‍यांनी ते कापसाने टिपून पिळून दाखवलं असतं.

मनोज सांगळे ः अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन हिवरा आश्रमला होणार होतं. हे संमेलन झालं असतं तर बुलडाणा जिल्ह्याचं सांस्‍कृतिक वैभव देशपातळीवर गेलं असतं. आश्रमात शैक्षणिक, आध्यात्‍मिक कार्य चालतं, तिथे कोणत्‍याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही हे अवघ्या बुलडाणा जिल्ह्याला, तिथे भेट देणाऱ्या प्रत्‍येकाला माहीत आहे. तरीही “अंनिस’ने आश्रमात होणाऱ्या संमेलनाला विरोध का केला?
नरेंद्र लांजेवार ः मुळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हिवरा आश्रमला होणाऱ्या संमेलनाला विरोध नव्हता. तो विरोध श्याम मानव यांच्‍या गटाचा होता. आम्‍ही खूप समजावून सांगितले. विरोध किती निराधार आहे हेही पटवून सांगितलं. पण श्याम मानव आणि आश्रमातील जुन्या वादामुळे हा वाद वाढत गेला आणि चांगल्या कार्याला गालबोट नको म्‍हणून आश्रमानेच आयोजकाच्‍या भूमिकेतून माघार घेतली. काही मोठ्या लोकांनी यात सहभाग घेऊन, विरोध करणाऱ्यांना आश्रमात आणलं असतं, तर त्‍यांचा विरोध तिथेच संपला असता आणि आश्रमात संमेलन झालंही असतं. त्‍यावेळची परिस्‍थितीच अशी होती की आमचे प्रयत्‍न अपुरे पडले. पण हे संमेलन न होण्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं.

मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://youtu.be/FuoS5iZkgDg