डर के आगे जीत हैं… पायात ताकद आहेत तोपर्यंत ते ‘बुलडाणा’ पोहोचवणार यशो’शिखरा’वर!; प्रशांत राऊत म्‍हणाले, बसं त्‍या क्षणापासून तुमच्यातील भीती संपणार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिद्द उराशी असली की काहीच अशक्य नसतं… ट्रेकिंग काय केवळ पुणे, मुंबईकरांनीच करावी असं थोडीच आहे… आपल्या बुलडाणा जिल्ह्यातही ट्रेकिंग ही संकल्पना रूजविण्याची गरज आहे… त्यासाठी पुढाकार घेणारे, स्वतःपासून सुरुवात करणारे ट्रेकर प्रशांत राऊत यांनी सॅटर्डे स्पेशल मुलाखतीतून ट्रेकिंगचे कंगोरे अगदी सोप्या भाषेत उलगडले. ट्रेक म्हणजे काय इथपासून तर सुरुवात …
 
डर के आगे जीत हैं… पायात ताकद आहेत तोपर्यंत ते ‘बुलडाणा’ पोहोचवणार यशो’शिखरा’वर!; प्रशांत राऊत म्‍हणाले, बसं त्‍या क्षणापासून तुमच्यातील भीती संपणार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिद्द उराशी असली की काहीच अशक्य नसतं… ट्रेकिंग काय केवळ पुणे, मुंबईकरांनीच करावी असं थोडीच आहे… आपल्या बुलडाणा जिल्ह्यातही ट्रेकिंग ही संकल्पना रूजविण्याची गरज आहे… त्‍यासाठी पुढाकार घेणारे, स्वतःपासून सुरुवात करणारे ट्रेकर प्रशांत राऊत यांनी सॅटर्डे स्पेशल मुलाखतीतून ट्रेकिंगचे कंगोरे अगदी सोप्या भाषेत उलगडले. ट्रेक म्‍हणजे काय इथपासून तर सुरुवात कशी केली पाहिजेत, त्‍यातील अडचणी यावर त्‍यांनी सविस्तर उहापोह केला. प्रश्नोत्तराच्‍या स्वरुपात त्‍यांची मुलाखत जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी घेतली. यावेळी बुलडाणा लाइव्हचे समूह सल्लागार मनोज सांगळे उपस्‍थित होते.

श्री. राऊत यांनी मुलाखतीत सांगितले, की मला ट्रेकची आवड आधीपासून होती. नोकरीला लागण्यापूर्वी मी अनेकदा ट्रेकिंगला गेलो होतो. नोकरीमुळे माझ्या या आवडीला बंधने लागतील असे वाटले होते. मात्र नोकरी केंद्र सरकारी लागल्यामुळे कामाचा आठवडा पाच दिवसांचा आहे. त्‍यामुळे दर आठवड्यात ४८ तास आवड जपायला मिळाले. नोकरीचा अडथळा ट्रेकिंगला कधीच आला नाही, असे ते म्‍हणाले. ट्रेकबद्दल ते म्‍हणाले, की ज्‍या वाटेने सहज जाता येत नाही थोडक्‍यात चोरवाटांनी गड, किल्ला सर करणे याला ट्रेक म्‍हणता येईल. ट्रेकिंगसाठी मनापासून इच्‍छा हवी. एखाद्या शिखरापर्यंत एखादा व्‍यक्‍ती पोहोचला आहे तर तो व्यक्‍ती पोहोचू शकला मग मी का नाही, अशी जिद्द हवी. वाट कशीही असो, मनात इच्‍छाशक्‍ती असली की ती सोपी होत जाते, असे ते म्‍हणाले.

ट्रेकिंगच्या तयारीबद्दल त्‍यांनी सांगितले, की ट्रेकला जायचेय असे ठरवले की सर्वांत आधी ठिकाण निश्चित करणे महत्त्वाचे असते. कोणता किल्ला, शिखर आपण चढणार आहोत, त्‍याचे आपल्या शहरापासून किती अंतर आहे, पायथ्याशी कसे पोहोचणार, चढाई कसे करणार याचे प्लॅनिंग आवश्यक आहे. मात्र हे करताना घरच्या जबाबदाऱ्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असेही श्री. राऊत यांनी आवर्जून सांगितले. ट्रेकिंगची ही वेगळी वाट कशी सूचली, याबद्दल ते सांगतात, की ट्रेक हा पहिल्यापासून माझा आवडता विषय आहे. इतर व्‍यक्‍ती जाऊ शकतात तर मी का नाही जाऊ शकत? असे सारखं वाटायचं आणि मग मी ट्रेकिंगला सुरू केली. निरोगी राहण्यासाठी ट्रेकिंग खूप आवश्यक आहे. मी एकट्याने तर केलेच, फॅमिलीलाही ट्रेक करवले. जिथे त्‍यांना नेता येईल तिथे नेले. माझा साडेचार वर्षांचा मुलगा विनायकनेही तीन ते चार ट्रेक केले आहेत. कळसूबाई शिखर दसऱ्यानंतर सर करण्यासाठी त्‍याला मी नेणार आहे. त्‍यालाही ट्रेकर बनवायचं असल्याचे मनोदय श्री. राऊत यांनी व्‍यक्‍त केला.

कोणतीही गोष्ट करताना त्‍यामागे कुणाची तरी प्रेरणा असते, याबद्दल प्रशांत राऊत सांगतात, की छत्रपती शिवराय हीच माझी प्रेरणा राहिली आहे. त्‍याकाळी कोणतीही साधने नसताना, ज्‍या पद्धतीने ते आणि त्‍यांचे मावळे गड सर करायचे ते थरारक अनुभव होते. तेच जगण्याचे, अनुभवण्याची जिद्द मी बाळगून आहे. ट्रेकिंग कधीही सुरू करा पण त्‍याआधी शारीरिक क्षमतेसाठी १५-२० दिवस तयारी आवश्यक आहे. पाच ते सात किलोमीटर रोज चालणे, तीन-चार लिटर पाणी आणि अडीच किलो खाद्यपदार्थ कॅरी करता येऊ शकेल इतके चालण्याची सवय हवी. रोपने लटकून ट्रेकिंग करायची असेल तर सूर्यनमस्कार, डिप्ससारख्या व्यायामाची गरज असते. ट्रेकिंगमुळे मानसिक क्षमता आपोआप येते. ट्रेकिंगसाठी साथीदार म्‍हणून बुलडाण्यातून मला कुणी भेटलेलं नाहीये. साथीदार गरजेचा आहे. ज्‍यांना ट्रेकिंगची आवड आहे, त्‍यांनी नक्कीच मला संपर्क करावा. बुलडाण्यात ट्रेकर्स तयार करून त्‍यांचा ग्रुप तयार करण्याची माझी इच्‍छा आहे, असेही ते म्‍हणाले. पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर या ग्रुपने मला कधीच बुलडाण्यातून मी एकटा आहे याची जाणीव होऊ दिली नाही हेही श्री. राऊत यांनी आवर्जून सांगितलं. ट्रेकला जाण्याआधी मानसिक तयारी करण्याबद्दल ते म्‍हणाले, की ट्रेकिंगला जाण्याआधी संकटांचा विचार आवश्यक ठरतो. किती वाईट परिस्‍थिती येऊ शकते याची कल्पना आधीच करणे आवश्यक असते. तयारी कल्पनेतच झालेली असल्याने प्रत्‍यक्षात ते संकट समोर आले की त्‍याला तोंड देणे सोपे होते. मनात जिद्द असेल तर संकटांना तोंड देण्याची क्षमता आपोआप तयार होते, असे त्‍यांनी सांगितले. ट्रेकला जाताना आम्ही सुरक्षेची साधनेही सोबत नेतो. प्रथमोपचाराची पेटी, सर्पदंश झाला तर सर्व व्यवस्‍था असते. रोमांचक थरार अनुभवायचा असेल तर ट्रेकला जाणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले.

बुलडाण्याच्‍या १०० किलोमीटरच्या परिघात १२ ते १३ गड किल्ले असे आहेत, जे सर करता येऊ शकतात, हेही त्‍यांनी सांगितले. बुलडाण्यापासून ४५ किलोमीटर अंतरावरील गोंधनखेडच्या किल्ल्याचा त्‍यांनी आवर्जुन उल्लेख केला. ट्रेक हा सर्व क्षमतांचा विकास करतो. पाल्यांना पुढच्या अायुष्यात खंबीर बनवायचे असेल तर लहानपणापासून ट्रेकला नेणे आवश्यक आहे. त्‍याला आपण सोबत नेतो तेव्हा येणाऱ्या संकटांची तयारी तो करतो. त्‍याच्‍यातील खंबीरता वाढते. यातून भविष्यात तो छोट्या छोट्या गोष्टीवरून विचित्र निर्णय घेत नाही, असे श्री. राऊत म्‍हणाले. भविष्यातील प्‍लॅनिंगबद्दल ते म्‍हणाले, की पायात ताकद आहे तोपर्यंत भटकंती करत राहणार. माझ्याकडून शक्‍य झाले नाही तरी मुलाला एव्हरेस्‍ट सर करायला लावायचे हे माझे स्वप्न आहे. त्‍याची तयारी आतापासूनच सुरू आहे, असेही त्‍यांनी सांगितले. प्रशांत राऊत यांची इच्‍छा, स्वप्न नक्कीच पूर्ण होवो या बुलडाणा लाइव्हतर्फे शुभेच्‍छा! श्री. राऊत यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ः +91 81699 05941 मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://youtu.be/oLRYyaA5I74