हजारो बुलडाणा शहरवासियांची उत्सुकता शिगेला! पीव्हीसी पोल के पिछे क्या हैं, पोल के उपर क्या हैं?

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा नगरीतील कार्यालये व शैक्षणिक संस्थांना वळसे घालत शहरातील मुख्य व अंतर्गत मार्गांच्या बाजूला सुनियोजित पध्दतीने उभारण्यात येणार्या चकचकीत, टोलेजंग पीव्हीसी पाईप्सने शहरातील प्रतिष्ठित, राजकारणी, अधिकारी ते सर्वसामान्य रहिवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय! यामागे नेमका काय उद्देश, निर्माते कोण, त्यातून काय साध्य होणार याबद्दल बुलडाणा नगरीत खमंग चर्चा, तर्क, वितर्कांना ऊत आला आहे. …
 
हजारो बुलडाणा शहरवासियांची उत्सुकता शिगेला! पीव्हीसी पोल के पिछे क्या हैं, पोल के उपर क्या हैं?

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा नगरीतील कार्यालये व शैक्षणिक संस्थांना वळसे घालत शहरातील मुख्य व अंतर्गत मार्गांच्या बाजूला सुनियोजित पध्दतीने उभारण्यात येणार्‍या चकचकीत, टोलेजंग पीव्हीसी पाईप्सने शहरातील प्रतिष्ठित, राजकारणी, अधिकारी ते सर्वसामान्य रहिवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय! यामागे नेमका काय उद्देश, निर्माते कोण, त्यातून काय साध्य होणार याबद्दल बुलडाणा नगरीत खमंग चर्चा, तर्क, वितर्कांना ऊत आला आहे. मात्र हे पोल नजीकच्या काळात आटपाट बुलडाणा नगरीत होऊ घातलेल्या तंत्रज्ञान क्रांतीचा श्रीगणेशा, मूकपणे साकारणारे तंत्रज्ञानाचे महाजाल आणि हजारो शहरवासीयांना भरभरून जलदगती सुविधा मिळण्याची हमी आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या अफलातून योजनेचा अनौपचारिक शुभारंभ झाला. रिलायन्स चे कवच लाभलेल्या जिओ कंपनीने हे काम हाती घेतले आहे. त्यांना बीएसनल, महेंद्रा अँड महेंद्रा यांच्यासह आदर्श वास्तू प्रायव्हेट कंपनी, प्रॉफिट प्लस मार्केटिंग एंटरप्राइज प्रायव्हेट कंपनीच्या सहकार्याची जोड आहे. शासनाच्या महानेट प्रकल्प अंतर्गत हे काम हाती घेण्यात आल्याचे आदर्शचे सोमनाथ पाटोळे व राजेश चव्हाण यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. पोलवर अत्याधुनिक क्लिप्स बसवून त्यावर 100 वर्षे आयुष्य असलेल्या 96 सूक्ष्म (मायक्रो) केबल्स टाकण्यात येतील. प्रारंभिक टप्प्यात शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँक, प्राथमिक, माध्यमिक शाळा ते महाविद्यालयालगत 350 पोल बसविण्यात येणार असून, आजअखेर दीड एकशे पोल उभारण्यात आले आहेत. यामुळे या आस्थापणांना फायबर ऑप्टिकल कनेक्टिव्हीटीद्वारे येत्या मार्च अखेर 5 जी सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे कार्यालयांमधील कामकाज जलदगतीने होणार असून, नागरिकांना सर्व शासकीय दाखले एका दिवसात मिळणार आहेत. तसेच लिंक अभावी ठप्प होणारे बँक, पोस्ट, दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्री व्यवहार अखंडितपणे सुरू राहणार आहे. दुसर्‍या टप्प्यात खासगी व्यक्ती, व्यापारी आस्थापना, व्यावसायिक, सर्वसामान्य जनतेसाठी शहरभरात तब्बल 3500 पोल व ऑप्टिकल फायबर्सचे जाळे उभारण्यात येणार असल्याचे संपूर्ण कामकाजावर करडी नजर ठेवून असणारे अभियंता मयूर मोहिते यांनी सांगितले. यातून कनेक्शन घेणार्‍या ग्राहकांना 5 जी मोबाईल सेवा, टीव्ही चॅनेल, वायफाय आदी सेवा घरबसल्या पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुलडाण्यानंतर चिखली व खामगाव तालुके व नंतर संपूर्ण जिल्ह्यात याच पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे शंकर मलबार यांनी सांगितले.