‘गोलंदाज शोध’ उपक्रमातून बुलडाणा जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी! विदर्भ क्रिकेट असोसिएशनची खुली निवड चाचणी १७ मे रोजी मलकापुरात..निवड झाली तर VPL खेळता येणार..नाव गाजणार

 
 मलकापूर :(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे (व्हीसीए) प्रतिभावान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘गोलंदाज शोध’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये खुल्या निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विदर्भ प्रीमियर लीग पर्व-२ च्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या उपक्रमामुळे युवा गोलंदाजांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या निवड चाचण्यांवर भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य, माजी राष्ट्रीय निवडकर्ता सुब्रोतो बॅनर्जी तसेच माजी बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासह व्हीसीएच्या विविध निवड समिती सदस्यांची देखरेख राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही निवड चाचणी १७ मे रोजी सकाळी ७ वाजता तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे होणार आहे. पुरुष गोलंदाजांसाठी वयोमर्यादा १६ ते २५ वर्षे तर महिला गोलंदाजांसाठी १५ ते २३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक खेळाडूंनी समन्वयक चंद्रकांत साळुंखे यांच्याशी संपर्क साधून गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२६ आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळणार असून तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण, फिटनेस मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलंदाजांना विदर्भ प्रीमियर लीग पर्व-२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा १ ते १५ जून २०२६ दरम्यान पार पडणार आहे.
खेळाडूंनी क्रिकेटचा पोशाख, शक्यतो पांढऱ्या रंगाचा, तसेच वयाचा वैध पुरावा सोबत आणावा, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिकेट समितीचे अध्यक्ष नितेश उपाध्याय, विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे बुलढाणा जिल्हा संयोजक किशोर वाकोडे आणि मोहम्मद साबिर यांनी केले आहे.