…आता विरोधकांची मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘फिल्डींग‘
वाझेंचे राजकीय हँडलर कोण आहेत? फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र
पोलीस दलातील फेरबदलानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता
मुंबई : व्यापारी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकप्रकरणाचा वाद शमताना दिसत नाही. याप्रकरणी सपोनी सचिन वाझेच्या सहभाग उघड झाल्याने अडचणीत आल्यानंतर राज्य सरकारने पोलिस दलात तडकाफडकी फेरबदल केले. त्यानुसार परमबीरसिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली.त्यांच्या जागी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना नेमण्यात आले. परमबीरसिंग यांना राज्य सुरक्षा महामंडळात पाठवण्यात आले आहे. इतरही काही अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सरकारला पोलीस दलात फेरबदल करायला लावल्यानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप अधिकच आक्रमक झाला असून त्यांनी आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. युवतीच्या आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढला असून आता याप्रकरणात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या राजीम्यासाठी आग्रह धरला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी तर नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंना निलंबित केले व पोलीस अधिकारी बदलले असले तरीही वाझेंना आदेश देणारे राजकीय नेते मंत्रिमंडळात कायम असून वाझेंचे ऑपरेटर/हँडलर कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे. हायकोर्टाच्या आदेशाने वाझे निलंबित असतानाही त्यांना नोकरीत परत का घेतले? त्यांना क्रीम पोस्टिंग का दिले? असा सवाल करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला घेरले आहे. त्यांच्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली असून हे प्रकरण राज्य सरकारला बरेच महागात पडेल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.