‘या’ पक्षाकडून काँग्रेसचा विश्वासघात; पटोले यांचा आरोप
मुंबई ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्यानंतरही पटोले काही माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आता तर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप करून अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे धोरण पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे सांगताना पटोले यांनी, आम्ही अनेक वेळा ठेच खाल्ली आहे. त्यामुळे आता पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे सूतोवाच केले. २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी पक्षाची व्यूहरचना ठरली आहे, असे त्यांनी सांगितले. एकीकडे शिवसेना व राष्ट्रवादीवर टीका करणार नाही, तशी माझी भूमिका नाही. ती जबाबदारी माझ्यावर नाही, असे सांगताना पटोले यांच्या टीकेचा रोख मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. भाजपवर हल्ला करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष असल्याने मी त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर थेट हल्ला करत असतो, असं पटोले यांनी स्पष्ट केले.