स्वबळाच्या मुद्यावर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचे कानावर हात!
नांदेड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आणि सत्तेत येण्याचा दावा केला आहे. त्यांच्या मुद्याशी दोन माजी मुख्यमंत्री सहमत असले, तरी एका माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्याला त्याबाबत काहीच माहिती नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
पटोले यांच्या स्वबळाच्या मुद्दयाची आता सहकारी पक्षच खिल्ली उडवित आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तर पटोले यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी स्वबळाच्या पटेल यांच्या सूरात सूर मिसळला आहे; मात्र तिसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वबळाच्या मुद्द्यावर कानावर हात ठेवले आहेत. पटोले यांच्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याने आता काँग्रेसचे नेतेही त्यांच्यापासून चार हात दूर राहत आहेत. पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी के. एच. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर नांदेडला आलेल्या चव्हाण यांना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याविषयी विचारले असता आपल्याला काहीच माहिती नाही, असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.