सुप्रियाताईंची अजितदादांना वाढदिवसासाठी “ही’ भेट
मुंबई: रक्षाबंधन आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीला भेट देत असतो. बहीणही भावाला कधी कधी भेट देऊन परतफेड करीत असते. राजकीय नेते मात्र बहिणीला आणि बहीण भावाला काही हटके भेटी देत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे बंधू, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अशीच खास हटके भेट दिली आहे.
पवार यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना भेट म्हणून “राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सुळे यांनी ही घोषणा केली. कोरोना काळात अनाथ झालेल्या राज्यातील ४५० मुलांसाठी ही योजना आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ती राबवली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनाथ मुलांना प्रेमाचा आधार दिला जाणार आहे. योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा आहे. पक्षातील ४५० सहकारी या मुलांची जबाबदारी घेणार आहेत. अनाथ मुलींची जबाबदारी पक्षातील महिला, युवती घेतील. मुलांची जबाबदारी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता घेणार आहे, असं सुळे यांनी सांगितलं.