सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ
प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याने कोर्टाने नाकारले अंतरिम संरक्षण
मुंबई : प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी अडचणीत आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणात अटकेची शक्यता लक्षात घेऊन अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. त्यांच्याविरोधात सकृतदर्शनी पुरावे आहेत. तसेच हिरेन यांच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे निरीक्षण नोंदवत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.आता त्यांच्या जामीन अर्जावर १९ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाशी निगडीत असल्याने त्याचा तपास एटीएस व एनआए या संस्था करत असून त्यांनी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान व्हॉटसअप स्टेटसवर आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, असे स्टेटस ठेवल्याने वाझे शनिवारी दिवसभर चर्चेत राहिले आहेत.