सचिन वाझे म्हणतायत ‘जगाचा निरोप घ्यायची वेळ आलीय‘
पोलीस अधिकार्याच्या व्हॉटसअप स्टेटसने राज्यात खळबळ
मुंबई : उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाने वादाच्या भोवर्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आता माझ्याकडे पेशन्स नाहीत,’ असे खळबळजनक विधान व्हॉटसअप स्टेटसवर ठेवल्याने त्याची राज्यभर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. हा पोलीस अधिकारी सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे मानसिक तणावात आल्याचे म्हटले जात आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीयांच्या निवासस्थानबााहेर ज्या कारमध्ये स्फोटके आढळली होती, ती कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळला होता. त्याप्रकरणी सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरही संशय व्यक्त केला जात होता. त्यावरून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. सचिन वाझे यांना अटक करावी, त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी,अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. त्यावर सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले होते. अखेर राज्य गृहमंत्रालयाने सचिन वाझे यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांना नागरी सुविधा केंद्रात हलविले होते. बदलीचे आदेश निघून २४ तांस उलटत नाहीत तोच वाझे यांनी ‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत २००४ पासून आपल्याला आपल्याच खात्यातील पोलीस अधिकार्यांकडून त्रास होत असल्याचाही उल्लेख स्टेटसमध्ये केला आहे. दरम्यान वाझे यांनी नैराश्यातून काही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून वरिष्ठ अधिकारी त्याच्याशी संपर्क साधून त्याची समजूत काढत असल्याचे समजते.