लैंगिक शोषण अन् खून जातीय तिरस्कारातून?
गडचिरोली ः जातीयता मनात इतकी खोलवर भिनलेली असते, की त्यातून बदला घेण्यासाठी कुणी कितीही खालच्या थरावर जातं. लैंगिक शोषण हा इतरांना दबावाखाली ठेवण्याचाच प्रयत्न असतो. असाच प्रकार गडचिरोलीत झाला.
दीक्षा बांबोळे ही तरुणी विनोद जक्कुलवार याच्या स्टुडिओत आणि सेतू केंद्रात कामानिमित्त सतत जायची. त्यातून दोघांची चांगलीच ओळख झाली. ओळखी प्रेमात प्रेमात रुपांतर झालं. विनोदनं दीक्षाला लग्नाचं आमिष दाखविलं. लग्न करणार असल्यानं तिनं त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. त्यामुळं दीक्षानं विनोदमागे लग्नाचा आग्रह धरला; परंतु विनोद लग्न करण्याचं वारंवार टाळीत होता. उलट, त्यानं तिला गर्भपात करायला भाग पाडलं. त्यानंतर विनोदनं तिच्या घरी जाऊन तिचा गळा आवळून तिचा खून केला. दीक्षाच्या खुनाची फिर्याद दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्याची चाैकशी करून, सोडून दिले. त्यामुळे शेड्यूल कास्ट फेडरेशननं आता या प्रकरणात लक्ष घातलं आहे. जातीय तिरस्कारातून तसेच लैंगिक शोषणातून दीक्षाचा खून झाला असून, या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी दीक्षाची आई किरण यांनी केली आहे.