राज्यमंत्री कडूंनी उद्धट कर्मचार्याच्या श्रीमुखात भडकावली
अकोला : प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा राग,रौद्र रूपाचा अनुभव याआधीही अनेकदा महाराष्ट्राने घेतला आहे़ पहले लाथ और जरूरत पडे तो फिर बात, असा त्यांचा खाक्या. अकोलावासियांना त्याची नुकतीच प्रचिती आली. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना दिल्या जाणार्या जेवणाबद्दल रुग्णांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याचा दर्जा व्यवस्थित नसल्याचा मुख्य आक्षेप होता. याप्रकरणी बच्चू कडू यांनी तेथील कॅन्टीनला भेट दिली व जेवणाच्या दर्जाची तपासणी केली.त्याचा दर्जा समाधानकारक नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथील अधिकारी कर्मचार्याला धारेवर धरले. त्यावेळी एका कर्मचार्याने राज्यमंत्र्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कडू यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी त्या कर्मचार्या कानशिलात भडकावली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरणाची एकच चर्चा सुरू झाली आहे.
राज्यमंत्री होण्याआधीही बच्चू कडू यांनी अपंगांसाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. कुठल्या अधिकार्याने ऐकले नाही, कामे केली नाहीत तर ते अशाच पद्धतीने त्याला धडा शिकवतात. राज्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी हीच स्टाईल कायम ठेवल्याचे दिसत असले तरीही थेट मारहाण करण्याच्या प्रकाराबद्दल कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत असून कर्मचारीही धास्तावले आहेत.