‘युपीए’च्या नेतृवासाठी संजय राऊतांचा शरद पवारांना आग्रह
राऊत यांच्या विधानाने काँग्रेस अस्वस्थ? नाराजी वाढण्याची चिन्हे
नाशिक : केंद्रातील मोदी सरकार व भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांच्या देशव्यापी फ्रंट अर्थातच युपीए आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आग्रह केला आहे. आजच्या घडीला अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये शरद पवार यांची विश्वासार्हता अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात भाजपविरोधक एक होऊ शकतील. त्यामुळे विरोधी आघाडी मजबूत करायची असेल तर युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी केले पाहिजे, अशी आमची इच्छा असल्याचे राऊत म्हणाले.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, सोनिया गांधी यांनी युपीए आघाडीचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले. पण सध्या त्या प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणात नाहीत. त्यामुळे पवारांसारख्या नेत्याने आघाडीचे नेतृत्व केले तर त्याचा फायदाच होईल, असा दावा राऊत यांनी केला.
काँग्रेसमध्ये अस्वस्थता?
राऊत यांनी याआधीही आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली होती.पण त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत कोणतेही वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही,असे स्पष्ट करत आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडेच राहील, असे म्हटले होते. हा मुद्दा अधिक ताणला गेल्यास त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर होऊ शकतो, असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला होता. त्यामुळे राऊत यांच्या या नव्या प्रस्तावाने काँग्रेस नेते पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.