माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह!; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा
मुंबई : मी कुणाचा अनादर करीत नाही, असे सांगताना पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्षात केंद्रीय नेत्यांवर विश्वास ठेवण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला. याचा अर्थ राज्यात त्या कुणालाही नेता मानायला तयार नाहीत, असा होतो. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच आपले नेते आहेत, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पंकजा यांनी निशाणा साधला.
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदातून डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली होती. त्या सर्वांची बैठक वरळीला घेऊन पंकजा यांनी त्यांचे राजीनामे फेटाळले. कार्यकर्त्यांना धीर दिला. या वेळी त्यांनी काही सूचक विधाने केली, रोखठोक भाष्य केलं. आम्ही कुणालाच घाबरत नाही, असं सांगताना त्यांनी थेट मोदी-शाह यांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे; पण आपण हा डाव यशस्वी होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू,” असा गर्भित इशारा त्यांनी दिला.