मराठा आरक्षणासाठी मोठ्या लढ्याची तयारी!
नाशिक (नाशिक लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा आरक्षणासाठी भाजपाने मोठ्या लढ्याची तयारी केली असून, त्यासाठी सर्व नेत्यांची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. आरक्षणासाठी सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र यावे. विनायक मेटे, संभाजी महाराजांनादेखील आम्ही एकत्र आणणार आहोत, असे भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा बांधवांच्या भावना समजून घेण्यासाठी बैठक घेतली असून, या बैठकीला राज्यभरातील समाजबांधवांना बोलवण्यात आले होते, असे विखे पाटील म्हणाले. आरक्षणासाठी लढणाऱ्या राज्यात 23 संघटना झाल्या आहेत. नेतृत्व कोणीही करावं, पण समाजात फूट पाडून स्वार्थ साधू नये. मी संभाजी महाराजांशी बोलणार आहे. त्यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती करणार आहे. सगळे एकत्र येऊन आठवडाभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचे नेतृत्व सामुदायिक असावे, असे विखे पाटील यांनी सांगितले.