पैशांचा पाऊस पडणार म्हणे, दरबुधवारी तीनवेळा झाला बलात्कार!; २७ वर्षीय तरुणीची पोलिसांत धाव
नाशिक (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैशांचा पाऊस पाडू असे म्हणून भुलथापा मारत दर बुधवारी बोलावून तीनदा २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे समोर आली आहे. गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह तिघांना अटक केली आहे.
कामिल गुलाम यासिन शेख (२९, रा. काशीबेरी, जि. जनाजपूर, पश्चिम बंगाल, सध्या रा. गंगापूर, जि. नाशिक) असे भोंदूबाबाचे नाव असून, स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (५६, रा. आंध्र प्रदेश, सध्या रा. वैष्णवी अपार्टमेंट, कामठवाडा), अशोक नामदेव भुजबळ (६३, रा. चांमुडेश्वरी, राधाकृष्णनगर, सातपूर) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. गेल्या वर्षी १३ डिसेंबर २०२० ते ९ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. डिसेंबर २०२० मध्ये फर्नांडिस व भुजबळ यांनी तरुणीची ओळख भोंदूबाबा कामिलशी करून दिली. त्यानेच तिला पैशांच्या पावसाचा मोह दाखवला. तिला गंगापुरातील पठाडे गल्लीत बोलावून एका पत्र्याच्या घरात नेले. तिथे पूजेच्या नावाखाली तिला विवस्त्र करून तीन वेळा बलात्कार केला. दर बुधवारी यासाठी तिला तीनदा बोलाविण्यात आले होते. वारंवार बलात्कार होऊनही पैशांचा पाऊस न पडल्याने तिने गंगापूर पोलीस ठाणे गाठले.