नारायण राणे-शिवसेनेचे तुझ्या गळा, माझ्या गळा…

सावंतवाडी : नारायण राणे आणि शिवसेनेचे विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्यात वारंवार राडे होतात. अगदी गेल्या महिन्यातही असाच राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात आ. नितेश राणे, खासदार विनायक राऊत आणि दीपक केसकर एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी परस्परांचं तोंडभरून काैतुक केलं. राज्यात शिवसेना-भाजप युती होण्याची तर ही चिन्हं नाहीत ना, अशी चर्चा …
 

सावंतवाडी : नारायण राणे आणि शिवसेनेचे विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्यात वारंवार राडे होतात. अगदी गेल्या महिन्यातही असाच राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात आ. नितेश राणे, खासदार विनायक राऊत आणि दीपक केसकर एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी परस्परांचं तोंडभरून काैतुक केलं. राज्यात शिवसेना-भाजप युती होण्याची तर ही चिन्हं नाहीत ना, अशी चर्चा त्यामुळं सुरू झाली.

शिवसेना आणि नारायण राणे म्हटले, की सातत्याने राडा आणि संघर्ष असे समीकरण ठरलेले असते; परंतु आता राजकीय हवामान बदलायला लागले आहे, की काय असा प्रश्न तळकोकणातील एका कार्यक्रमावरून येतो. कोकणात झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेना आणि राणे कुटुंबीय एकत्र आले. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी दिल्लीतून या कार्यक्रमात आभासी उपस्थिती लावून नांदा साैख्य भरेचा आशीर्वाद दिला. सागररत्न मत्स बाजारपेठेच्या लोकार्पणासाठी आ. नितेश राणे, खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेही आॅनलाईन सहभागी झाले. एकमेकांना एकेरीवर बोलणारे, प्रसंगी राडा करणारे, जाहीर शिव्याशाप देणारे, राणे आणि राऊत ही मंडळी एकाच व्यासपीठावर पाहून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

नितेश राणे यांनी या सभेत युतीची शक्यता व्यक्त केली. आजचं हे व्यासपीठ बघितल्यानंतर युतीची आशा करणारे आमचे असंख्य चाहते सुखावले असतील आणि रात्री चांगले झोपतील. कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाबरोबरही एकत्र येण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू’ असे ते म्हणाले. राऊत यांनी तर नितेश राणेंचा खांदा थोपटला. त्यांनी नितेश राणे यांचा उल्लेख माझे मित्र असा करताच हास्यकल्लोश झाला. हसू नका आम्ही आहोत मित्र. आम्ही परस्परांचं अभिनंदन केलं. माणूस विचाराचा श्रीमंत असला पाहिजे,’ असं ते म्हणाले.