नाराज काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; संजय राऊतांबद्दल तक्रार
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये सध्या विविध मुद्यांवरून अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. अधूनमधून त्यांचे मतभेद प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचून ’बातमी’चा विषय बनत आहेत. विशेषत: घटक पक्ष काँग्रेस व या पक्षाचे नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र नाराज आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी निधी वाटपात काँग्रेसच्या वाट्याला येणारा अन्याय, सांगितलेली कामे न होणे यासह इतर काही मुद्यांवर असलेले मतभेद,नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्यात आली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सातत्याने केलेल्या वक्तव्यांबाबतही काँग्रेस नेत्यांनी ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदींनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींच्या वेळी विशेषत: अनिल देशमुख प्रकरणात काँग्रेसला विश्वासात घेण्यात आले नाही. राज्यात निधी वाटपात अन्याय होत असून काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना अर्थमंत्रालय निधी देत नाही. शिवाय पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी सांगितलेली कामे होत नाही, आदी तक्रारी यावेळी काँग्रेस नेत्यांनी ठाकरे यांच्याकडे केल्या. किमान समान कार्यक्रमातील मुद्यांचा आढावा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्यावर एक समन्वय समिती नेमण्याचे संकेत ठाकरे यांनी दिले. याशिवाय संजय राऊत यांनी युपीए आघाडीबाबत केलेल्या वक्तव्यांविषयीदेखील या नेत्यांनी ठाकरेंकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी सांगितले.