नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लग्नाचे आमिष दाखवून ३ वर्षे लैंगिक अत्याचार
जालना : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत तीन वर्षे अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात काल, १५ सप्टेंबर रोजी २० वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून अनिल रामराव धुमाळ (रा. शेवगा, ता. परतूर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
रेणापूर (जि. लातूर) येथील एका नर्सिंग महाविद्यालयात तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेते. अनिलने तिच्यासोबत ओळख वाढविली. त्यानंतर मोबाइलच्या माध्यमातून ते सतत एकमेकांच्या संपर्कात राहिले. याचदरम्यान अनिलने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. युवतीने लग्नाबद्दल विचारणा केल्यावर तुझे “ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. नातेवाईकांना दाखवेन, अशी धमकीसुद्धा अनिलने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित तरुणी अनुसूचित जातीची असल्याने अनिलविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४ तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली.