धूमधडाक्यातलं लग्न पडलं महागात; आमदार पुत्रांविरोधातही गुन्हा
सोलापूर : कोरोनाचा विळखा असताना भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांची लग्न अतिशय धूमधडाक्यात आणि थाटामाटात पार पडली. कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली करून झालेल्या या विवाहांवर टीका झाली. त्यानंतर पोलिस जागे झाले. त्यांनी आमदार राऊत यांच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आ. राऊत यांच्या रणजित व रणवीर अशा दोन्ही मुलांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याअगोदर आयोजक योगेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आमदार पुत्रांना मात्र क्लीन चिट दिली होती. या मुद्यावर पोलिसांवर टीका झाली. सोलापूर जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून, कोरोनाचे निर्बंध कायम आहेत. असे असताना आमदार पुत्रांच्या लग्नात मात्र मुखपट्टी, सामाजिक अंतर भान, वैयक्तिक स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक निर्बंधाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. शनिवार- रविवार वीकेंड लाॅकडाऊन असताना खुद्द लोकप्रतिनिधींनी नियमांना हरताळ फासला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक हे आमदार, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदी या लग्नाला उपस्थित होते.