धक्कादायक… पुनवर्सन केंद्रात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; डाॅक्टरासह काळजीवाहकाविरुद्ध गुन्हा
नागपूर : लाइफस्कील्स पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या १६ वर्षीय मुलीला लैंगिक छळाला सामोरे जावे लागले. संस्थाचालक डॉक्टर व काळजीवाहकाविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी अत्याचारासह अन्य गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. अभिजित सेनगुप्ता व काळजीवाहक अनु राजन आचार्य ही आरोपींची नावे आहेत. डाॅ. सेनगुप्ता याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलगी कायम तणावाखाली राहायची. तिला नातेवाइकांनी सेनगुप्ता यांच्या लाइफस्कील्स केंद्रात उपचारासाठी दाखल केले. काळजीवाहक अनुने या मुलीचा लैंगिक छळ केला. त्याने चार वेळा तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिला, ‘लग्न करून तुला पुण्यात शिकवायला पाठवेल,’असे आमिष दाखविले. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. डाॅ. सेनगुप्ता याने हे माहीत असताना काळजीवाहकाच्या चुकांवर पांघरूण घातले. पीडितेच्या नातेवाइकांना याबाबत कळल्यानंतर एका नातेवाइकाने फिर्याद दिली. काळजीवाहकाला अटक करण्यात आली आहे.