दारूच्या पाच बाटल्या, पाच बोकड अन्‌ १ लाख लाख रुपये दिले तर घेणार होते समाजात परत!

पुणे : राज्य सरकारने जात पंचायतींविरोधात कायदा करून चार वर्षे झाली असली तरी जात पंचायतींच्या नावाने सामाजिक अन्यायाची दुकाने अजून सुरूच आहेत. जात पंचायतींविरोधात तक्रार करायला कुणी धजावत नाहीत आणि कुणी तक्रार केली, तर त्याला मारहाण करण्यापर्यंत संबंधितांची मजल जाते. पुण्यात असा प्रकार घडला आहे. पुण्यातील एका महिलेला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले होते. या …
 

पुणे : राज्य सरकारने जात पंचायतींविरोधात कायदा करून चार वर्षे झाली असली तरी जात पंचायतींच्या नावाने सामाजिक अन्यायाची दुकाने अजून सुरूच आहेत. जात पंचायतींविरोधात तक्रार करायला कुणी धजावत नाहीत आणि कुणी तक्रार केली, तर त्याला मारहाण करण्यापर्यंत संबंधितांची मजल जाते. पुण्यात असा प्रकार घडला आहे.

पुण्यातील एका महिलेला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले होते. या महिलेला समाजात वावरणे, विवाह तसेच दुःखाच्या प्रसंगातही जाता येत नव्हते. त्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली. त्यामुळे जात पंचायतीच्या कथित “न्यायाधीशांना’ चांगलेच झोंबले. त्यांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी या महिलेसह तिच्या कुटुबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी रुपेश कुंभार, निखील कुंभार आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. आईच्या मालमत्तेचा न्यायनिवाडा जात-पंचायतीसमोर करण्यास या महिलेने विरोध केला होता. त्याचा राग आल्याने आणि जात पंचायतीला जुमानत नसल्याने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केलं. समाजामध्ये परत यायचं असल्यास दारूच्या पाच बाटल्या, पाच बोकड आणि एक लाख रुपयांचा दंड जातपंचायतीने ठोठावला. न्यायालयात गेल्यास समाजातून कायमस्वरुपी बहिष्कृत करण्याची धमकी देण्यात आली. तिला मदत करणाऱ्यांना जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती.