तुरुंगातील कैद्यांची चंगळ ः मटण, मासे, मिठाई, चिकन मिळणार
पुणे : कैद्यांना आता बेचव जेवण्याची वेळ येणार नाही. त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ कँटीनमधून विकत घेऊन खाता येणार आहेत. चिकन, अंडी, मांस, मिठाई, सुकामेवा असे पदार्थ खाऊन जिभेचे चोचले पुरविता येणार आहेत.
पूर्वी कैद्यांना जेलर ठरवील तेच खावे लागायचे; परंतु आता जेलसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत नव्या नियमालीची माहिती दिली. या पदार्थांची यादीच तुरुंग प्रशासनाने जाहीर केली आहे. कैद्यांच्या घरून मिळालेल्या पैशातून त्यांना हे पदार्थ विकत घेता येतील. चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, हंगामी फळे, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, समोसा, च्यवनप्राश, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, काॅफी या पदार्थांची यादी वाचून जिभेला पाणी सुटले ना. आता कैदीही त्याचा आस्वाद घेऊ शकतील.