तिरंगा लावलेल्या आरोपी गाडीतून बाळ बोठेचा प्रवास ?
नगर पोलीस अडचणीत; रेखा जरेंच्या मुलाची व्हीआयपी ट्रीटमेंटवर नाराजी
नगर : नगर येथील एका संघटनेच्या पदाधिकारी रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपी तथा पत्रकार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक करून नगरला आणले. पण त्याला तेथून आणताना पोलिसांनी तिरंगा ध्वज लावलेल्या वाहनातून आणण्यात आले. तसेच कोठडीतही त्याला बेड्या न घालता त्याची व्हीआयपी बडदास्त ठेवण्यात आली. त्याला रेखा जरे यांच्या मुलाने तीव्र आक्षेप घेतला आहे.आरोपी बाळ बोठेने एवढे नीच कृत्य केलेले असल्याने त्याला तिरंगा लावलेल्या वाहनातून आणणे आपल्याला रेखा जरे यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून लाज वाटते. पोलीस असे करूच कसे शकतात,असा सवाल कुणाल जरे याने विचारला आहे. बाळ बोठे हा सरकारचा पाहुणा आहे का ? असा प्रश्न विचारत त्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जरे यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास आपण आत्मदहन करू, असा इशाराही कुणाल जरे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.