डॉक्‍टरांचा अजब दावा… म्‍हणे कोरोनाचा रुग्‍ण योग्‍य मात्रेत दारू पिल्याने होतो रिकव्हर!; म्‍हणे असे 50 रुग्‍ण केले बरे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एका डॉक्टरांनी अजब शोध लावला आहे. ज्याची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. अरुण भिसे नावाच्या या डॉक्टरांनी योग्य मात्रेत देशी दारू घेतली तर कोरोनावर अगदी बिकट परिस्थितीतही मात करता येते, असा अफलातून शोध लावला आहे. या उपचाराने आजवर 50 रुग्ण आपण बरे केल्याचा दावाही या डॉक्टरांनी केल्याने खळबळ उडाली आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एका डॉक्‍टरांनी अजब शोध लावला आहे. ज्‍याची चर्चा संपूर्ण राज्‍यभर सुरू आहे. अरुण भिसे नावाच्‍या या डॉक्‍टरांनी योग्‍य मात्रेत देशी दारू घेतली तर कोरोनावर अगदी बिकट परिस्‍थितीतही मात करता येते, असा अफलातून शोध लावला आहे. या उपचाराने आजवर 50 रुग्‍ण आपण बरे केल्याचा दावाही या डॉक्‍टरांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ही पोस्‍ट सध्या व्‍हायरल होत आहे. मात्र या डॉक्‍टरांचा सल्ला रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाइकांनी अंमलात आणू नये, असे आवाहन बुलडाणा लाइव्‍ह करत आहे. कारण डॉक्‍टरांच्‍या या दाव्‍याबद्दल कोणताही ठोस पुरावा नाही.

डॉ. अरूण ताराचंद भिसे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव, जि.नगर) या डॉक्‍टरांशी बुलडाणा लाइव्‍हने संपर्क केला, मात्र कालपासून त्‍यांचा नंबर आऊट ऑफ कव्‍हरेज येतोय. या डॉक्‍टरांना शेवगावच्‍या तहसीलदारांनी चौकशीला बोलावले आहे. या चौकशीनंतरही डॉक्‍टरसाहेब आपल्या दाव्‍यावर ठाम राहिले तर वैद्यकीय क्षेत्रात हा उपचार खरच लाभदायी ठरतो का, यावर खल होऊ शकतो. डॉ. भिसे यांचे बोधेगावमध्ये सिताई हॉस्पिटल असून, त्‍यांनी आयुर्वेदातील बीएएमएस पदवी घेतली आहे. ते अनेक वर्षांपासून येथे सेवा देत आहेत. काल दुपारी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून हा अजब दावा केला.

ही आहे डॉ. भिसे यांची पोस्‍ट…
एका रुग्‍णाच्‍याआई 60 वर्षे वयाच्या व अर्धवट बेशुद्ध होत्या. खोकला खूप व दम पण लागत होता. तेव्हा त्यांनी घरगुती काढे व वाफ सुरू केली. परंतु खोकला कमी होत नव्हता. आईने जेवण जवळपास बंद केल्याने गोळ्या औषधे देता येत नव्हते. मात्र त्यांना एका व्यक्तीने सल्ला दिला की आईला थोडी थोडी देशी दारू दे. त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून 60 ml देशी दारू दिली. त्याबरोबर आईना थोडी भूक लागली व आईने जेवन केले आणि बघता बघता रोज 60 ml देशी दारूने आई पूर्ण रिकव्हर झाल्या. मी गुगल व युट्यूबवर शोधाशोध केली. अल्कोहोल व कोरोना यावर काही संशोधन सुरू आहे का तर बरीच सकारात्मक माहिती मिळाली. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने दारू कोरोनावर उपयुक्त नाही हे स्पष्ट केले आहे हे पण समजले. माझा थोडा हिरमोड झाला पण मी याकडे दूर्लक्ष करून डायरेक्ट पेशंटवर त्याच्या संमतीने ट्रायल घेण्याचे ठरवले. आतापर्यंत जवळपास 50 पेशंटवर (त्यातील जवळपास 10 पेशंट सिरीयस होते) त्यांना बेड न मिळाल्याने ते नाईलाजाने घरीच उपचार घेत होते. अशा पेशंटला शासकीय तज्‍ज्ञ समितीने ठरवून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे उपचार सुरू केले व सोबत पेशंटला 30 ml देशी दारू सकाळी- संध्याकाळी 30 ml पाण्यासोबत घेण्याची विनंती केली. ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी हा उपाय केला आणि त्यातील 100 टक्‍के रुग्ण बरे झाले. सतत दारू पिणे आरोग्यासाठी घातक आहे. आपल्याला फक्त औषधी मात्रेत 7 ते 10 दिवस द्यायची आहे. यातुन मला दारूच्या व्यसनाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करायचे नाही…याची नोंद घ्यावी.

अद्याप पोस्‍ट तशीच…
अधिकाऱ्यांनी दम भरूनही डॉक्‍टरांनी अद्याप ती पोस्‍ट तशीच आजही फेसबुकवर ठेवली आहे, हे विशेष.

अधिकाऱ्यांकडून चौकशी
शेवगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी डॉ. भिसे यांची भेट घेऊन योग्य ती खात्री झाल्याशिवाय अशा पोस्ट व्हायरल करू नका, अशी समज दिली आहे. त्यानंतर तहसीलदार अर्चना पागिरे यांनी त्‍यांना चौकशीसाठी बोलावले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.