जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी हालचाली गतिमान; प्रस्ताव मार्गी लागणार!
पालकमंत्र्यांची आरोग्य मंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सोयी सुविधा व वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई स्थित मंत्रालयातील समिती सभागृहात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
यावेळी आरोग्य मंत्र्यांनी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयासाठी निधी वितरित केला असल्याचे सांगितले. तसेच या ग्रामीण रूग्णालयासाठी निविदा काढण्यात यावी, असेही संबंधित अधिकार्यांना सूचीत केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असेही सांगितले. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची अडचण आहे, त्याबाबत संबंधित अधिकार्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अवगत करावे. तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, असा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात 9 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व 58 उपकेंद्र स्थापित करण्यात येणार आहे. या सर्वांचे प्रस्ताव 31 जानेवारी 2021 पूर्वी सादर केले जातील, असे सहसंचालक आरोग्य यांनी बैठकीदरम्यान सांगितले. बैठकीला आरोग्य विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.