जमिनीच्या वादातून दोन महिलांनी तिसरीला पेटविले
नगर जिल्ह्यातील घटना भावकीचा वाद भडकला
नगर : जमिनीचा वाद कोणत्या टोकाला जाईल काही सांगता येत नाही. भावकीमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून चुलत सासू व जावेने एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मनोली गावात घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत पीडित महिला ६० टक्के जळाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, मनोली गावातील अर्चना सदाशिव शिंदे (वय २४) यांना त्यांच्याच भावकीतील आकांक्षा शंकर शिंदे व हरणाबाई शिंदे या दोन महिलांनी जमिनीच्या वादातून पेटवून दिले. यापैकी आकांक्षा ही अर्चनाची चुलत जाऊ असून हरणाबाई ही चुलत सासू आहे. अर्चनाच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन हरणाबाई शिंदे यांना हवी होती. पण ती तिने परस्पर विकली. त्याचा राग त्यांच्या मनात होता. अर्चना घरासमोरील सरपण तोडत असताना आकांक्षा व हरणाबाईने तेथे येऊन तिला मारहाण व शिवीगाळ केली. तसेच तिच्या अंगावर डिझेल टाकून तिला चक्क पेटवून दिले. तिने आरडाओरड केल्याने तिची मुले व आजूबाजूचे लोक धाव आले. त्यांनी आग विझविलीव अर्चनाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.