छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात २२ जवान शहीद
पाच नक्षलींचा एन्काउंटर; १७ जणांचे मृतदेह मिळाले
रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. नक्षलप्रभावित बीजापूर व सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले आहेत. रविवारी १७ जवानांचे मृतदेह सापउले असून आणखी काही जवान बेपत्ता असल्याचे समजते. या चकमकीत जवानांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
बस्तर भागात शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) बटालियन व सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. यावेळी चार तासांपेक्षा जास्त वेळ गोळीबार झाला. जवानांनी जंगलात नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरू असताना जवानांच्या ताफ्याला घेरून नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधूंद गोळीबार केला.यात सैन्य तुकडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाच शहीद जवानांचे मृतदेहशनिवारीच मिळाले होते. तर १७ जवानांचे शव रविवारी सकाही प्राप्त झाले. आणखी काही जवान बेपत्ता असून या हल्ल्यात ३० जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रांची, सुकमा आदी ठिकाणी उपचार सुरू आहेत.
बीजापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक कामालोचन कश्यप यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे या हल्ल्यात नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी एका महिला नक्षलीचाही मृतदेह आढळला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेला यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा नक्षलींना दिला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली व जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली.