चोरी करताना चोरट्यांच्या हाती लागला लग्नातला अल्बम अन् मग वाचा काय घडलं…
अहमदनगर : मध्यरात्री घरात चोरटे शिरले. घरातील एका मुलीच्या गळ्याला चोरट्यांनी चाकू लावला. त्यामुळे घरातील बाकीचे स्तब्ध झाले. चोरट्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. एका चोरट्याच्या हातात घरातील लग्नाचा अल्बम लागला. लग्नात घरातील महिलांच्या अंगावर बरेच दागिने फोटोंत दिसत होते. चोरट्यांनी लगेच मग या फोटोंत जे जे दागिने दिसत आहेत ते काढून द्या असे फर्मान सोडले. जिवापेक्षा काय दागिने मोठे होते… भीतीने गर्भगळीत झालेल्या घरातल्या लोकांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने हवाली केले. त्यानंतर आणखी काही रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात ही घटना आज समोर आली आहे. बेलापूर गावातील उदय खंडागळे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. आवाजामुळे घरातील सर्व जण जागे झाले. मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याने घरातील सदस्य घाबरले होते. चोर निघून गेल्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.