चारपानी सुसाईड नोट लिहून डॅशिंग महिला वनअधिकार्‍याची गोळी झाडून आत्महत्या

वरिष्ठ अधिकार्यांकडून त्रास होत असल्याचा पत्रात उल्लेख; आठ दिवसांपूर्वीच घेतली होती कोरोना लस अमरावती : पळून गेलेल्या डिंक तस्करांचा बाईकवरून मध्य प्रदेशपर्यंत पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळणार्या २८ वर्षीय डॅशिंग महिला वनअधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चारपानी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होत …
 

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्रास होत असल्याचा पत्रात उल्लेख; आठ दिवसांपूर्वीच घेतली होती कोरोना लस

अमरावती : पळून गेलेल्या डिंक तस्करांचा बाईकवरून मध्य प्रदेशपर्यंत पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळणार्‍या २८ वर्षीय डॅशिंग महिला वनअधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चारपानी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा उल्लेख केला असून त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या पत्रातील मजकूर अद्याप बाहेर आलेला नाही. त्यामुळे ते अधिकारी कोण याचा तपशील समजू शकला नाही.
दीपाली चव्हाण यांचे मूळ गाव मराठवाड्यातील आहे. त्या अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हण्ूान कार्यरत होत्या. धारणी तालुक्यात हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील शासकीय निवासस्थानी गुरुवारी रात्री दिपाली या एकट्याच होत्या. त्यांचे पतीही शासकीय अधिकारी असून त्यांची बदली अन्यत्र आहे. दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री सातच्या सुमारास स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात काही अधिकार्‍यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक होत असलेल्या मानसिक त्रास व दबावाचा उल्लेख आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी दीड ते दोन तास कुणालाच घरात प्रवेश दिला नव्हता. दीपाली या हसमुख, प्रसन्न व आधुनिक विचारांच्या अधिकारी होत्या. तसेच त्या गर्भवती होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वीच सोमवारी त्यांनी कोरोनाची लस घेतली होती, असेही समजते. दिपाली यांनी धूळघाट येथ्े असताना मध्य प्रदेशात पळून गेलेल्या सालई डिंक तस्करांना बाईकवरून पाठलाग करून पकडले होते.