घरी नसताना हल्ला करता, तुम्हालाही मुलंबाळं आहेत लक्षात ठेवा… नारायण राणेंचा इशारा; म्हणाले अरेस्टबिरेस्ट काही नाही!
मुंबई ः मुलं किंवा मी घरी नसताना घरावर हल्ला करण्यात आला. तुम्हालाही मुलंबाळं आहेत हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला दिला आहे.
आपल्याला अरेस्टबिरेस्ट काही झाली नाही. माझ्याच गाडीने संगमेश्वरहून महाडपर्यंत प्रवास केला. ते तुम्हीही तपासा. माझ्या गाडीचा नंबर तुम्हाला देतो. मला कोणी अटक केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा दिल्यानंतर त्यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रपरिषद घेऊन पुन्हा शिवसेनेला डिवचले.
संगमेश्वरला राणेंना अटक करण्यात आली होती. रात्री अकराला त्यांना महाड न्यायालयाने जामीन दिला. माझ्याविरुद्ध जी कलमं लावली होती, त्यामुळे न्यायालयात हजर व्हावं लागलं. तसे पोलिसांनीच सांगितलं होतं. त्यांनी मला विनंती केली. मी त्यावर सहकार्य केले, असे राणे म्हणाले. एवढा राग येण्यासारखं मी असं काय चुकीचे बोललो होतो, असा प्रश्नही त्यांनी पुन्हा केला. ते वाक्य परत बोलणार नसल्याचेही ते म्हणाले.
राणेंची जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेत महाड येथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांना कितवा स्वातंत्र्य दिन माहीत नाही. त्यांनी सचिवाला तरी विचारायला हवे होते. मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती, अशी टीका राणेंनी केली होती. त्यावरून संतप्त शिवसैनिकांनी काल दिवसभर राणेंच्या विरोधात आंदोलने केली. ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या.