गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टांगती तलवार?
शरद पवारांनी जयंत पाटील, अजित पवारांना दिल्लीला बोलावले
महत्वाचा मोठा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे
मुंबई : सचिन वाझे, अॅन्टिलियाबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि आता परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमधील १०० कोटींच्या खंडणीचे प्रकरण यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्रालय आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती वादाचे सर्कल तयार झाले आहे. त्याचे वलय वरचेवर गडद होत असून त्याची छाया महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना व काँग्रेसवर होत आहे.त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिल्लीस पाचारण केले आहे. विरोधकांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. देशमुख राजीनामा देण्यास तयार नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. देशमुख यांच्याविरोधात भाजपने राज्यभर निदर्शनेह सुरू केली आहेत. शिवाय या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ईडीकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडून शिफारस आली तर राज्य सरकार बडतर्फ करून राष्ट्रपती शासन लावण्याचा विचारदेखील केंद्र सरकार करू शकते. त्यामुळे हे प्रकरण कसे हाताळायचे याचा विचार पवार करत असून ते सरकारमधील नेत्यांना योग्य तो सल्ला देतील, असे म्हटले जात आहे. पवारांनी बोलावलेल्या बैठकीस शिवसेनेचे नेते संजय राऊत हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला गेल्यास ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे, असेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.