गतिमंद मुलीला नराधमाने बनविले वासनेची शिकार; अमरावतीतील घटना
अमरावती : महिलांवरील अत्याचारविरोधी कायदे कितीही कडक केले, तरी पुरुषी मानसिकता आणि विकृती किती खालच्या थरावर गेली आहे, याची प्रचिती वारंवार येत असते. मुंबईत तीन महिन्यांच्या बालिकेवर तृतीयपंथीयाने केलेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच अमरावतीत एका मतिमंद मुलीवर वासनांध नरामधमाने अत्याचार केला.
हा नराधम पीडिता व तिच्या बहिणीच्या परिचयाचा आहे. मतिमंद मुलगी व एक चिमुकली घरात होती. मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यासाठी नराधमाने चिमुकलीला चिप्स आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठविले. नंतर त्याने मतिमंद मुलीला वासनेची शिकार बनविले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सतीश हंसराज भाले (रा. एरंडगाव ता. नांदगाव खंडेश्वर) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित तरुणी मतिमंद आहे. ती लहान बहिणीसह शहरात राहते. ही लहान परिचारिका आहे. परिचारिका नोकरीवर गेल्यानंतर घरात तिची सहा-सात वर्षांची मुलगी आणि मतिमंद बहीण राहतात, हे हेरून नराधमाने आपला कार्यभाग साधला. पीडितेची बहीण रुग्णालयातून घरी परत आली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेला घटनाक्रम तिला सांगितला. या गंभीर प्रकरणी पीडितेच्या बहिणीने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.