आता पोलिस पाटलांच्या नादी लागाल तर तुरुंगात जाल!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावातील कायदा व सुरक्षा सांभाळणारा शासनाचा अधिकारी म्हणून पोलिस पाटलाकडे पहिले जाते. गावातील हेवेदावे तसेच अन्य कारणावरून अनेकवेळा पोलिस पाटलांना मारहाणीचे प्रकार समोर येत होते. आता मात्र हे धाडस कोणालाही महागात पडू शकते. यापुढे पोलिस पाटलांच्या कामात अडथळा आणला, मारहाण केली तर थेट तुरुंगात जावे लागेल, असे आदेश गृहविभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयाला दिले आहेत.
सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांना शिवीगाळ करणे, हल्ला करणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्यांवर भादवी कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये आरोपीला पाच वर्षांची शिक्षेची तरतूद आहेे. पोलीस पाटलांना शासकीय कर्मचाऱ्यांसारखे संरक्षण मिळावेे, यासाठी राज्य पोलीस पाटील संघटनेने मागील काही दिवसांपासून मागणी लावून धरली होती. मुंबईत या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गृहराज्यमंत्री शहरे, मुख्य सचिव गृह आदींसोबत 3 डिसेंबर 2020 रोजी एक बैठक पार पडली होती. याच बैठकीमध्ये पोलीस पाटलांना मारहाण किंवा कामात अडथळा निर्माण करणार्या संबंधित आरोपीविरुद्ध भादंवि 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला होता. या बैठकीतील निर्णयानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालयांना एक पत्र पाठवले आहे. पोलीस पाटलांना यापुढे मारहाण झाली तर संबंधितांवर कलम 353 नुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.