आठ दिवसांत आणखी एक मंत्री घरी जाईल; चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा
पुणे : हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली. वनमंत्री संजय राठोड यांच्यानंतर अनिल देशमुख यांच्या रुपाने ठाकरे सरकारमधील दुसर्या मंत्र्याची विकेट पडली आहे.पण विरोधक त्यावर समाधानी नाहीत. त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला राजीनामा देऊन घरी बसावे लागेल, असा इशारा दिला आहे. ठाकरे सरकार त्यांच्या कर्माने मरेल, अशी जळजळीत टीका पाटील यांनी केली आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील कोरोना स्थिती व लॉकडाऊन संदर्भातही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. पण त्यावेळी त्यांचे मिनी लॉकडाऊनबाबत बोलणे झाले होते.प्रत्यक्षात सरकारने आदेश हे कडक लॉकडाऊनचे काढले. ही भाजप व सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे. आम्ही ती सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील अनेक व्यापार्यांनी आपल्याला फोन करून या लॉकडाऊनला विरोध केला आहे.काहीही झाले तरीही दुकाने सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. करोना काळात चांगल्या निर्णयांत सरकारला सहकार्य करू. पण चुकीच्या निर्णयांविरोधात संघर्ष करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.