अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब देणार राजीनामा?
नैतिकतेच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; परब म्हणतात, चौकशीला तयार
मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या मागे लागलेले अडचणींचे शुक्लकाष्ठ संपायला तयार नाही. एकीकडे सरकारमधील अनेक मंत्री, आमदार कोरोनाच्या संसर्गाने वैतागले आहेत. दुसरीकडे विविध घोटाळे, वादग्रस्त प्रकरणांत नावे येत असल्याने ते विरोधकांच्या रडारवर आहेत. आठ दिवसांत आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा विरोधकांनी दिला होता. त्यानंतर सचिन वाझे यांनी एनआयएकडे दिलेल्या जबाबात परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्याला एका कंपनीकडून ५० कोटी तर बिल्डरांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक खुलासा लेखी पत्रात केला आहे.
परमबीरसिंग यांच्या पाठोपाठ सचिन वाझेचा हा लेटरबॉम्ब राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणारा ठरला आहे.पण विरोधकांनी आव्हान दिलेले ते दुसरे मंत्री अनिल परब तर नाहीत ना? अशी चर्चा सुरू झाली असून अनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परब यांनीही नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.दुसरीकडे परब यांनी आपल्याला या जगात आपल्या मुली सर्वात जास्त प्रिय आहेत.त्यांची शपथ घेऊन सांगतो की वाझेंनी केलेले आरोप धादंत खोटे आहेत. आपण असली कुठलीही वसुली करण्यास कुणालाही सांगितले नव्हते. आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत.आपण कधीच करणार नाही. मी कुठल्याही चौकशीला तयार आहे, आहे, असे स्पष्ट केले. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळचे असल्यानेच मला अडचणीत आणण्यासाठी असे आरोप केले जात आहे,असा दावा त्यांनी केला. पण वाझेच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्यास देशमुखांप्रमाणेच परबदेखील गोत्यात येऊ शकतात, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. शिवाय विरोधक अनिल देशमुखांप्रमाणेच परब यांचाही राजीनामा घ्या म्हणून ठाकरे सरकारवर दबाव आणतील, अशी शक्यता आहे.