क्या बात..! आता घरबसल्या मागवता येतील पुस्तके! अन् पाठवताही येईल..! डाक विभागाचा "ज्ञान पोस्ट" उपक्रम! अधिक जाणून घ्या....
May 8, 2025, 08:38 IST
बुलडाणा(जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डाक विभागामार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेली ‘ज्ञान पोस्ट’ ही सेवा विद्यार्थ्यांसह शाळा, लेखक, प्रकाशक यांच्यासाठी नवी संधी घेऊन आली आहे. आता कोणतीही शैक्षणिक पुस्तकं किंवा साहित्य कमी दरात, ट्रॅकिंगसह, देशात कुठेही पाठवता येणार आहे.
या नव्या सुविधेअंतर्गत किमान 300 ग्रॅमपासून ते जास्तीतजास्त 5 किलो वजनाचे पुस्तकं पाठवण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे, ही सर्व प्रक्रिया ट्रॅक अँड ट्रेस प्रणालीअंतर्गत असेल, म्हणजेच पुस्तक कुठपर्यंत पोहोचले आहे हे पाठवणाऱ्याला नेहमी कळत राहील. वाचकाला पुस्तक मिळाल्यावर पाठवणाऱ्याला पावतीही मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी आता अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं घरबसल्या मागवता येतील, आणि ती सुरक्षितपणे वेळेत पोहोचणार याची खात्रीही मिळणार आहे. शाळा, प्रकाशक, शैक्षणिक संस्था आणि लेखकांसाठीसुद्धा ही सेवा एक क्रांतिकारी बदल घेऊन आली आहे, असे मत बुलडाणा डाक विभागाचे अधीक्षक गणेश आंभोरे यांनी व्यक्त केले.
डाक विभागाने यासाठी रास्त दर ठेवले असून ही सेवा शिक्षण क्षेत्रातील डिजिटल आणि लॉजिस्टिक क्रांतीचा एक भाग ठरणार आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.