

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी! उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाचे महत्त्वाचे मार्गदर्शन... उन्हाळी पिकांसाठी "या" आहेत विशेष सूचना
Mar 27, 2025, 20:34 IST
बुलडाणा(जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उन्हाळाच्या कालावधीत उष्माघात व उष्णतेच्या लाटेमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत उपाययोजनसबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहे. या मार्गदर्शक सूचनाचे शेतकऱ्यांनी अवलंब करावे, असे आवाहन जिलहा अधिक्षक कृषि कार्यालयाचे कृषि उपसंचालक अनुराधा गावडे यांनी केले आहे.
उन्हाळ्यातील भूजल पातळी खालावते म्हणून शेतकऱ्यांनी पिकांना ओलीत करतेवेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही अशा पध्दतीने पाणी द्यावे. फळबाग, भाजीपाला या पिकांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा. ज्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होईल. पिकांना सिंचनासाठी आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर करावा, कारण उन्हाळ्यात भूजल पातळी खालावलेली असते. सध्याच्या हवामान परिस्थितीत पिकाला पाण्याचा ताण बसू नये, म्हणून ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. कोरडे हवामान, उच्च तापमान लक्षात घेता सुर्यफुल पिकाला वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. म्हणून पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे.
कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास लिंबू झाडांची वाढ कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ठिबक सिंचनाने ४ ते ५ दिवसांच्या अंतराने लिंबू बागेला ओलीत करावे. उष्णतामानाचा केळी बागेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून बाष्पीभवन रोखण्यासाठी केओलीन बाष्परोधक ८० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात २० ते ३० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारावे. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे परिपक्व झालेली वांगीची प्रत खराब होऊ शकते. म्हणून शक्यतो ताबडतोब परिपक्व वांगी काढून त्याची प्रतवारी करावी व ती वांगी बाजारपेठेत विक्रीस पाठवण्याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यातील ३७° अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असलेले कमाल तापमान व कमी झालेली आर्द्र पेरू फळबागेतील फळधारणा योग्य रीतीने होण्यास बाधक ठरते व त्यामुळे फळगळ होऊन एकंदरीत उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून उच्च तापमानापासून संरक्षण म्हणून फळबागेत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा. वाढत्या तापमानाची कक्षा लक्षात घेऊन कांदा पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतेवेळी ते प्राधान्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावे.
पिकांच्या व्यवस्थापनाकरीता तसेच उष्णतेच्या लाटेपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईट https://mausam.imd.gov.in वर हवामानाविषयी अद्यावत माहिती घेत राहावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.