तुरीचे भाव घसरले! नवीन तूर बाजारात येण्याआधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले....
Jan 3, 2025, 12:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीत शेतमालांच्या भावाचा मुद्दा चांगलाच गाजला. सर्वच पक्षांच्या वतीने आम्ही सत्तेत आल्यास शेतमालाचे भाव वाढवू असा शब्द निवडणूक प्रचारादरम्यान दिला होता. मात्र विधानसभा निवडणुका आटोपल्या तरी परिस्थिती "जैसे थे "च आहे... नव्हे तर त्याहीपेक्षा बिकट झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन कडून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती, मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे यंदा उत्पादनात घट झाली..शिवाय सोयाबीनचे दरही घसरले असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा तिथेच शेतकऱ्यांना पूर पिकाकडून चांगली अपेक्षा होती..मात्र नवीन तूर बाजारात येण्याच्या आधीच तुरीचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गत काही महिन्यांपूर्वी तुरीला १० ते १२ हजार प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला होता. मात्र आता दरात चांगलीच घसरण झाली आहे. पुढच्या महिनाभरात नवीन तुर बाजारात येण्याची शक्यता असतानाच तुरीचे भाव ५ हजार ते ८ हजार रूपयापर्यंत खाली घसरले आहेत. गत पंधरा दिवसात तुरीचे भाव क्विंटल मागे अडीच ते तीन हजार रुपयांनी घसरले आहेत. तुर आणि सोयाबीन प्रमाणेच कापसाची स्थितीही तीच आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टीने शेतात पाणी साचले. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली, वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. धुक्यामुळे तुरीची फुले गळून पडली अशाने पूर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उत्पादन जेव्हा कमी होते तेव्हा भाव वाढतात हा नियम असला तरी सध्या मार्केटमध्ये मात्र तुरीचे भाव घसरले आहेत...