"थर्टी फर्स्टच्या"पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; अवैध मद्य विक्री, वाहतूक रोखण्यासाठी उचलली पावले; ९ महिन्यांत बुलडाणा जिल्ह्यात पकडला २ कोटी २८ लाखांचा माल..
नाताळ व नववर्ष आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा कार्यालयाच्यावतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा, राज्य उत्पादन शुल्क देऊळगाव राजा व राज्य उत्पादन शुल्क खामगाव व राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकुन कारवाई करणे चालु आहे. तसेच नववर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या, हॉटेल्समध्ये होणारी मद्यविक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विक्री, मद्यनिर्मीती व वाहतुक प्रकरणी दि. १ मार्च २०२४ पासून ते आजपर्यंत विशेष मोहिम राबवून २ कोटी २८लक्ष ४६ हजार १७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार २२९ व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १०४ वाहन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे साहेब व विभागीय उप-आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
शासनाच्या नियमानुसार दारु पिण्यासाठी मद्यसेवन परवाना असणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील परमीट रुम, बीअरबार, वाईन शॉप, देशी दारु दुकानचालक यांना त्याबद्दल सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मद्यसेवन परवाना नसल्यास व्यक्तीला व अल्पवयीन तरुणांना मद्यविक्री केल्यास अनुज्ञप्तीधारकांवार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.