आंदोलनाचा बॉम्ब! कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा सरकारला १८ मार्चपर्यंत अल्टिमेट!

 १९ मार्चला राज्यभरातील शेतकऱ्यांची फौज मुंबईत धडकणार! तुपकर म्हणाले शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ! पुण्यात पार पडली क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक...
 
 
पुणे(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक आज पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडली. संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्यानंतर रविकांत तुपकर यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप झाला. या भाषणातून रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. "विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना खूप आश्वासने दिली, मात्र कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. सोयाबीन कापूस भाव फरक योजना, कांद्याचा प्रश्न , ऊसाचा प्रश्न , रखडलेले अनुदान असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सत्तेवर आल्यास कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारने दिले होते मात्र सरकारने शब्द पाळला नाही. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. १८ मार्चपर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा १९ मार्चला राज्यभरातील शेतकऱ्यांची फौज मुंबईत धडकेल." असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मुंबईतील आंदोलनाची दिशा काय असेल हे सध्याच सांगत नाही, कारण सरकार लगेच अटकेची कारवाई करते. मात्र हे आंदोलन सरकारला घाम फोडणारे असेल असे रविकांत तुपकर यांनी ठणकावून सांगितले. 
advt
Advt. 👆

   राज्य कार्यकारणीच्या बैठकीच्या प्रारंभी रविकांत तुपकर यांनी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदासह महत्त्वाच्या नियुक्त्या या बैठकीत करण्यात आल्या. रविकांत तुपकर यांच्या भाषणाआधी प्रख्यात वक्ते यशवंत गोसावी यांचेही भाषण झाले. बैठकीचा समारोप करताना रविकांत तुपकर म्हणाले की, क्रांतिकारी शेतकरी संघटनेची लढाई आईचं कुंकू वाचवण्यासाठी, बापाचे पाय फासाकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या दुसऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची ही लढाई असल्याचे तुपकर म्हणाले. या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा काळोख आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्या जाते. दररोज बलात्काराच्या बातम्यांनी वर्तमानपत्राची पाने भरलेली आहेत असा अंधकारमय महाराष्ट्र आधी कधीच नव्हता. या काळोखात इमानदारीची पणती घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले..
क्रांतिकारी शेतकरी संघटना मिरवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संघटना काम करणार आहे असे तुपकर म्हणाले. ज्यांना संघटनेची जबाबदारी मिळालेली आहे त्यांनी प्रामाणिकपणे काम करा, महाराष्ट्रात संघटन उभे करा . आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांसाठी आत्तापासून कामाला लागा असेही रविकांत तुपकर कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. क्रांतिकारी शेतकरी संघटना या राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे नेतृत्व उभे करणार आहे. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार ही आपली संस्कृती नाही, सामान्य कार्यकर्त्याचे नेतृत्व उभे करण्याचे काम क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून होणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. 
  
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वृद्धीसाठी वक्त्यांची शिबिरे होणार आहेत. व्यवसाय वाढीसाठी देखील शिबिरांचे आयोजन संघटनेच्या वतीने आगामी काळात करण्यात येणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. सध्या परिस्थिती बिकट आहे, शेतकऱ्याचे हाल होत आहेत. मात्र सरकारला देणे घेणे नाही आणि विरोधी पक्षाकडे ती ताकद नाही. आता सरकारला हलवण्याची ताकद आपल्यालाच निर्माण करावी लागेल. क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे राज्यातील शेतकरी आशेने पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चळवळ पुढे नेण्यासाठी झपाटून कामाला लागावे लागेल असे तुपकर म्हणाले.