State News : २१ वर्षीय तरुणीने आईचेच व्हॉट्स ॲप हॅक करून मिळवले खासगी फोटो, तिच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे : पुण्यात एका २१ वर्षीय तरुणीचा भलामोठा कारनामा समोर आला आहे. तिने तिच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यावसायिकाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. आधी आईचे व्हॉट्स ॲप हॅक केले. त्यातून आईचे व तिच्या प्रियकराचे खासगी फोटो मिळवले. त्यानंतर हे फोटो त्या व्यावसायिकाला पाठवून १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने ३ लाख रुपये दिलेसुद्धा. मात्र त्रास असह्य झाल्याने आणि भविष्यातही खंडणी मागितली जाणार नाही याची हमी नसल्याने तातडीने पोलिसांत संपर्क केला.
विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणात मिथून मोहन गायकवाड (२९, रा. कुरबावी, ता. माळशिरस) आणि कर्वेनगर येथील २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. ४२ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली होती. त्याचा बिल्डिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे मेमध्ये दोन व्यक्ती आले. त्यांनी बांधकाम साहित्याची चौकशी करून लगेचच शिविगाळ करत तुझे एका महिलेसोबतच्या अफेअरचे फोटो आमच्याकडे अाहेत. कारमध्ये बस, असे म्हणून कारमधून अलंकार पोलीस चौकीकडे नेले. महिलेसोबतचे त्याचे फोटो व्हिडिओ, फोटो दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
असे करायचे नसेल तर १५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. महिन्याला १ लाख व ८ महिन्यांनंतर सगळे पैसे द्यायचे, असे धमकावले. व्यावसायिकाने घडलेला प्रकार महिलेला सांगितला. मात्र यातून आपल्याच मुलीने हे सर्व कुभांड रचल्याने तिच्या लक्षात आले नाही. ३ लाख रुपयांची खंडणीही आरोपींनी उकळली. मात्र त्रास वाढतच असल्याने व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तपास सोपवला.
महिलेचे व्हॉट्स ॲप हॅक होऊन खंडणीखोरांकडे फोटो गेल्याने त्यांचा संशय सर्वात आधी मुलीवरच आला. तिची गोपनीय माहिती काढणे त्यांनी सुरू केले तेव्हा तीच खंडणीखोरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पैसे मागण्यासाठी फोन आल्यानंतर दगडूशेठ गणपती मंदिर परिसराजवळ पैसे देण्यास बोलाविण्यात आले. त्याठिकाणी गायकवाडला पैसे घेताना अटक करण्यात आली. त्याला खाक्या दाखवताच त्याने तरुणीच्या सांगण्यावरून का कट रचल्याची कबुली दिली. त्यामुळे तरुणीलाही अटक करण्यात आली.