State News : महिलांचे कपडे घालून करायचा चोऱ्या!; औरंगाबादच्या चोरट्याची शक्कल!!
औरंगाबाद : चोऱ्या करण्यासाठी चोर काय शक्कल लढवेल सांगता येत नाही. आताचे नव्या जमान्यातील चोरही अपडेट झालेत आणि त्या चोरट्यांचा छडा लावणारे पोलिसही. औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या अनेक घटना घडल्या. या घटनांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. शोध घेताना पोलिसांच्या हाती एक असा भामटा चोरटा लागला ज्याची चोरी करण्याची शक्कल पाहून क्षणभर पोलीसही चक्रावले.
अंगावर महिलांचे कपडे, गाऊन घालून हा भामटा चोऱ्या करत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून त्याने ही शक्कल लढवली. मात्र एक -दोन ठिकाणीच नाही तर अनेक ठिकाणी चोऱ्या करताना त्याने हीच शक्कल लढवल्याने त्याची ही शक्कल अंगलट आली. अनेक ठिकाणच्या चोऱ्यांमध्ये सीसीटीव्हीत कैद झालेली ही महिला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. औरंगाबाद पोलिसांनी अटक केलेल्या या भामट्या चोरट्याचे नाव नईम उर्फ चुन्नू उस्मान शहा असं आहे.